दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांचे जनतेला आवाहन.
मुंबई दि.१५: दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारार्थ बुधवार दि. १५ मे २०२४ रोजी वडाळा, मुंबई येथील जाहीर सभेला शिवसेना नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी सांगितले की, राहुल शेवाळे यांनी गेल्या १५ वर्षात या भागात विकासात्मक कार्य करून मतदारसंघाचे चित्र बदलले आहे. येथील जनतेने देखील त्यांना कायमच भरभरून प्रेम दिलेले आहे. यावेळी देखील येथील जनता राहुल शेवाळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून त्यांना विक्रमी मतांनी लोकसभा निवडणुकीत विजयी करतील अशी खात्री शिवसेना नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
या जाहीर सभेला, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, दक्षिण-मध्य मुंबई लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे, शिवसेना प्रवक्ते राजु वाघमारे, शिवसेना उपनेत्या तृष्णा विश्वासराव, मा. नगरसेविका पुष्पा कोळी यांसह महायुतीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, येथील जनतेला पक्की खात्री झाली आहे की, काँग्रेस हे जळतं घर आहे आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी एकच मार्ग आहे तो म्हणजे धनुष्यबाणाचा. एका बाजूला विकास आणि दुसऱ्या बाजूला द्वेषाचे राजकारण सुरू आहे. कोस्टल रोड, धारावी, बीडीडी चाळीचा पुनर्विकास, इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक अशा अनेक कामांना सुरुवात झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला संविधान मिळाले आहे स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. हिंदू कोड बिल लागू व्हावे याकरिता त्यांनी राजीनामा दिला होता. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील काँग्रेस सोबत न जाण्याचा सल्ला जनतेला दिला होता. ज्या ज्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईतून निवडणुकीला उभे राहिले त्यावेळी त्यांना पाडण्याचे काम हे काँग्रेस पक्षाने केले असल्याची आठवण डॉ. गोऱ्हे यांनी जनतेला करून दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास देशाची राज्यघटना बदलणार असा अपप्रचार विरोधकांकडून वारंवार करण्यात येत असून समाजात दुही माजविण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेली राज्यघटना ही आपल्या अभेद्य अशा सह्यादी पर्वतासारखी असून कोणालाही त्यावर प्रहार करण्याची इच्छा नसल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.
महिला धोरणातून महिलांना प्रशासकीय व अर्थिक पाठबळ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महिलांना ५० टक्के बसमधे सवलत, आनंदाचा शिधा, लेक लाडकी योजना, येत असलेली मोफत शिक्षणाची योजना यातून शासन महिलांसाठी चांगले कार्य करीत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनातून महिलांना सक्षम केले जात आहे. महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारमुळे महिला सुरक्षित असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.