मुंबई, दिनांक १५ मे २०२४
स्व. उत्तमराव पाटील अमृतकुंभ अभियान अंतर्गत, भाजपा मुंबई, “ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन” भाजपा मुंबईच्या वसंत स्मृती कार्यालयात संपन्न झाले. मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार, माजी मंत्री . प्रकाश मेहता यांचे मार्गदर्शन ज्येष्ठ कार्यकर्त्यांना लाभले.
यावेळी बोलताना मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार म्हणाले, जुने ज्येष्ठ कार्यकर्ते हा भारतीय जनता पक्षाचा ठेवा असून त्यांच्या परिश्रमातून पक्ष आज उभा आहे. त्यांच्यामुळेच पक्षाची यशस्वी वाटचाल चालू आहे. आपण मुंबई-महाराष्ट्राच्या संघटनेच्या पायाचे दगड आहात, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
माजी मंत्री प्रकाश मेहता यांनी स्व.उत्तमराव पाटील यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. गत 40-50 वर्षांत पक्ष संघटनेने घेतलेल्या भरारीचा आढावा घेऊन, उपस्थितांना भावुक केले. मोठ्या संख्येत उपस्थित असलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना संबोधन करताना अभियानचे प्रदेश संयोजक मा.आ. श्री. मधु चव्हाण यांनी असे सांगितले की, मुंबईच्या संघटन कार्यात ज्यांनी आपल्या आयुष्याची मोलाची वर्षे खर्ची घातली आणि ज्यांच्यामुळे पक्ष आजच्या सुस्थितीत उभा आहे, अशा ज्येष्ठ- जुन्या कार्यकर्त्यांची आजही पक्षाला अभिमानपूर्वक आवश्यकता आहे असेही ते म्हणाले.
गत दीड वर्षे, भाजपा महाराष्ट्रचे अध्यक्ष .चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने ” स्व. उत्तमराव पाटील अमृतकुंभ अभियानाच्या” माध्यमातून श्री.मधू चव्हाण आणि श्री. दिलीप गोडांबे यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात प्रवास करून ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी संपर्क- संवादाच्या माध्यमातून ज्येष्ठ जुन्या कार्यकर्त्यांप्रती आदर व्यक्त केला. वयाची 60/ 65 वर्षे वा त्याहून ही वयाने वरिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्षाला विसर पडलेला नाही.
भारतीय जनता पार्टी मुंबईच्या जेष्ठ कार्यकर्ता संमेलनाकरिता श्री. दिलीप गोडांबे यांच्यासह श्री. अश्विनी कुमार मिश्रा, बाबा कुलकर्णी, श्रीमती रसिलाबेन शाह, राजू संगोई, दिलीप हजारे आणि पद्माकर हबीब यांनी परिश्रम घेत संमेलन यशस्वी केले.