पुणे : ३७वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा रविवार, दि. ३ डिसेंबर रोजी ‘ब्राह्म मुहूर्त रन’ म्हणून संपन्न होणार असून, त्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पुरुष महिलांच्या मॅरेथॉनचा फ्लॅग ऑफ सणस मैदानाजवळील कल्पना/विश्व चौक येथून समारंभपूर्वक होर्इल. या मॅरेथॉनमध्ये १२ हजारहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला असून, केनिया, इथोपिया, टान्झानिया, मलेशिया यांसह विविध देशांतील नामवंत ७० आंतरराष्ट्रीय धावपटू सहभागी होणार आहेत. तसेच बॉम्बे सॅपर्स, एएसआय, सैन्य दल, रेल्वे, पोलीस यांतील नामवंत धावपटू व महिला विभागात राष्ट्रीय विजेती ज्योती गवते, साक्षी भंडारी, भाग्यश्री भंडारी व शीतल भंडारीदेखील सहभागी होणार आहेत. अशी माहिती अॅड. अभय छाजेड (विश्वस्त), रोहन मोरे (जॉइंट रेस डायरेक्टर), सुमंत वार्इकर (रेस डायरेक्टर)यांनी येथे दिली
ते म्हणाले,’‘पर्यावरणसंवधनासाठी पळा’ हे यंदाचे घोषवाक्य आहे. थायसन ग्रुपचे विशेष पथकांसह पर्यावरणसंवर्धन मोहिमेसाठी सहभागी होणार आहे. या स्पर्धेसाठी ‘We create livable planet’ असे घोषवाक्य असून, तंदुरुस्तीसाठी एकत्र येऊन १००हून अधिक अभियंते यामध्ये सहभागी होणार आहेत. पुणे महानगरपालिकेतर्फे या स्पर्धेतील विजेत्या धावपटूंना दरवर्षीप्रमाणे यंदाही ३५ लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.रविवार, दि. ३ डिसेंबर रोजी पहाटे ३.३० वाजता ४२.१९५ कि.मी.ची पूर्ण मॅरेथॉन, पहाटे ४.०० वाजता अर्धमॅरेथॉन सकाळी ६.१५ वाजता १० कि.मी., ६.४५ वाजता ५ कि.मी., ७.१५ वाजता व्हीलचेअर व ७.२० वाजता ३ कि.मी.ची ‘फॅमिली रन’ होर्इल. यावेळीदेखील मॅरेथॉन स्पर्धेमध्ये १७ सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या ६व्या कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे प्रत्येक गटातील पहिले ३ विजेते सहभागी होणार आहेत.पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमधील यंदाचे नाइट रनचे तिसरे वर्ष आहे. मागील वर्षी रात्री १२.०० वाजता लॅग ऑफ करण्यात आला होता. मात्र, मुख्य मार्ग सिहंगड रस्त्यावरील वाहतूक रात्री १२.०० वाजतादेखील कमी झाली नव्हती. त्यामुळेच यंदा पूर्ण मॅरेथॉनची वेळ पहाटे ३.३० वाजता करण्यात आली आहे. पुरुष व महिलांची पूर्ण स्पर्धा सणस मैदानाजवळील कल्पना/विश्व चौकापासून–सारसबाग–वीर सावरकर पुतळा– सिंहगड रस्ता–नांदेड सिटी– आतील सर्कला वळसा घालून त्याच मार्गे कल्पना/विश्व चौक येथे परत आणि पुन्हा त्याच मार्गाने जाऊन व येऊन ४२.१९५ कि.मी. अंतर पूर्ण केले जाणार आहे.अर्ध मॅरेथॉनमधील स्पर्धक वरील मार्गाप्रमाणे जाऊन-येऊन एकाच फेरीत स्पर्धा पूर्ण करतील. बाकी सर्व स्पर्धा कल्पना/विश्व चौकातून निघून १० कि.मी. संतोष हॉल येथून परत, 5 कि.मी. गणेशमळा चौक येथून परत व ३ कि.मी. व व्हीलचेअर दांडेकर पूलपर्यंत जाऊन परत अशा असणार आहेत. या सर्व मार्गावर संयोजकांतर्फे मोटारसायकल व सायकल पायलट असतील. सर्व गटांतील धावपटूंनी आपली शर्यत सुरू होण्यापूर्वी अर्धा तास प्रारंभ रेषेजवळ येणे आवश्यक आहे.स्पर्धेच्या ४२.१९५ कि.मी.च्या मार्गावर प्रत्येक कि.मी.वर स्पंजिंग, फीडिंग व वैद्यकीय सुविधा प्रत्येक १ कि.मी.डॉक्टररांसह अॅम्ब्युलन्स असणार आहे. या संपूर्ण मार्गावर पुणे महानगरपालिकेतर्फे सर्वत्र पुरेसा प्रकाश असण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या स्पर्धेच्या मार्गावर ज्या विविध स्पर्धा वळण घेऊन मागे फिरतील, त्या टर्निंग पॉइंटवर पंच, टाइमकीपर्स तांत्रिक अधिकारी आदी असणार आहेत.या स्पर्धेसाठी २००हून अधिक डॉक्टर्स व २५०हून अधिक नर्सेस जबाबदारी सांभाळणार असून, डॉक्टर राजेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे वैद्यकीय पथक काम करणार आहे. नवले हॉस्पिटल, सिम्बायोसिस, बी.व्ही.जी. १०८ अॅम्ब्युलन्स, संचेती हॉस्पिटल आणि भारती हॉस्पिटल यांनी या वैद्यकीय पथकात संयोग दिला आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी एक हजारहून अधिक कार्यकर्ते काम करीत असून, शहर पोलीस व ट्रॅफिक पोलीस यांचेही मोठे सहकार्य लाभले आहे. चंद्रशेखर आगाशे शारिरिक शिक्षण कॉलेज, सरहद संस्था आणि कॉलेज, सायक्लोहोलिक्स, आझम कॅम्पस, पुणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स संघटना, अद्वेत क्रीडा सेल, कावेरी कॉलेज व अवामी महाज यांनी यामध्ये सहयोग दिला आहे.या ३७व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने आदल्या दिवशी शनिवार, दि. २ डिसेंबर रोजी सकाळी११.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत मॅरेथॉन भवन येथे क्रीडासाहित्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, क्रीडासाहित्य तयार करणाऱ्या ३८ कंपन्या यात सहभागी झाले आहेत. या दिवशी स्पर्धेत नोंदणी केलेल्या स्पर्धकांना टी–शर्ट, चेस्ट नंबर व गुडी बॅग देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ३ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता सणस मैदान येथे महाराष्ट्र विधनासभेतील काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी माजी गॄह राज्यमंत्री रमेश बागवे, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे,खा. वंदना चव्हाण, आ. दीप्ती चवधरी,आ. रवींद्र धंगेकर, व सिम्बायोसिस संस्थेच्या संचालिका विद्या येरवडेकर १७ सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या ६व्या कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे संयोजक संजय नहार व डॉ. शैलेश पगारिया आदी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित रहातील.

