पुण्यातील महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने उपक्रम : तब्बल ४५० हून अधिक गायींना दररोज मिळणार चारा
पुणे : ‘गोमाता चारा खा.. पाणी पी आणि सुखी रहा’ हा आगळा-वेगळा उपक्रम महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने सुरु करण्यात आला आहे. वाढत्या उन्हाच्या झळा गोमातेला देखील सोसाव्या लागत आहेत. अनेक ठिकाणी दुष्काळामुळे गोमातेला चारा – पाणी मिळत नाही, यासाठी महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने हे अभियान राबविण्यात येत आहे, अशी माहिती महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली.
या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील श्री बोरमलनाथ गोशाळा ट्रस्ट येथे सुमारे ४५० हून अधिक खिलार,थारपार,गीर जातीचे गोवंश आहेत. या गोशाळेतील गोवंशांना दररोज सुमारे ६ टन चारा लागतो, ज्याचा दर दिवसाचा खर्च सुमारे १० हजार आहे. लीला मणियार यांनी गाईंसाठी ५० हजार रुपयांचा चारा उपलब्ध करून देत या उपक्रमाला प्रारंभ झाला.
शेखर मुंदडा म्हणाले, आपण गायीला मातेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे गोमातेची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. उन्हाळ्यात महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण होते. त्यामुळे गोमातेला चारा आणि पाणी देखील मिळत नाही. यासाठी ‘गोमाता चारा खा… पाणी पी आणि सुखी रहा’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. फेडरेशनच्या अंतर्गत महाराष्ट्रात २ हजार ५०० पेक्षा अधिक सामाजिक संस्था कार्यरत आहेत. या संस्थाच्या माध्यमातून व सहकार्याने हा उपक्रम मोठ्या स्तरावर राबविला जाईल.