कारची किंमत सुमारे २० लाख रुपये
इलॉन मस्क यांनी आपली कंपनी टेस्ला भारतात लाँच करण्याचा रोडमॅप बनवला आहे. टेस्लाने पुढील वर्षी मस्क यांच्या संभाव्य भारत भेटीपूर्वी तयारीला अंतिम रूप देण्यास सुरुवात केली आहे. वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी नुकतीच टेस्लाच्या कॅलिफोर्नियातील उत्पादन प्रकल्पाला भेट दिली. सूत्रांनुसार, टेस्ला इंडियाचा कारखाना गुजरात किंवा महाराष्ट्रात सुरू होण्याची शक्यता आहे. येथून दरवर्षी ५ लाख ईव्ही कार तयार होऊ शकतात.
टेस्ला इंडियाच्या एंट्री लेव्हल कारची किंमत सुमारे २० लाख रुपये आहे. आयात शुल्कात कपात करण्याबाबत केंद्र सरकारने टेस्लाशी सहमती दर्शवली आहे. याचा खुलासा अद्याप झालेला नाही. पुढील वर्षी जानेवारीमध्ये मस्क यांच्या संभाव्य भारत भेटीदरम्यान टेस्ला इंडियाबद्दल अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.
टेस्लानेही भारतात ‘पॉवरवॉल’ तयार करून विकण्याची योजना आखली आहे. ‘पॉवरवॉल’ ही बॅटरी स्टोरेज सिस्टीम आहे. जी सोलर पॅनलपासून काम करते. अंदाजे एक मीटर उंचीची ही ‘पॉवरवॉल’ यंत्रणा गॅरेजमध्ये किंवा घराबाहेर ठेवता येते. अमेरिकेतील ह्यूस्टन आणि डॅलसमध्येही लोक ‘पॉवरवॉल’ प्रणालीद्वारे अतिरिक्त वीज ग्रीडला विकत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे कौतुक केले आहे.
टेस्लाच्या कॅलिफोर्नियातील उत्पादन प्रकल्पाच्या भेटीदरम्यान वाणिज्य मंत्री पियुष गोयल म्हणाले की, टेस्ला कंपनीने भारताचाही पुरवठा साखळीत समावेश केला आहे. हे एक सकारात्मक पाऊल आहे. गेल्या वर्षीपर्यंत टेस्लाने भारताकडून सुमारे ८३०० कोटी रुपयांचे सुटे भाग मागवले होते. या वर्षाच्या अखेरीस टेस्ला आपल्या ईव्ही कारसाठी १६.६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. भारतीय विक्रेते २०२१ पासून सुटे भाग पाठवत आहेत. टेस्लाला भारतीय घटकांचा दर्जा आवडतो.
२०३० पर्यंत जगभरात २० दशलक्ष ईव्ही विकण्याचे मस्क यांचे उद्दिष्ट आहे. यासाठी त्यांना भारताला आशिया व पॅसिफिक महासागर क्षेत्रासाठी निर्यातीचा आधार बनवायचा आहे. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडसह दक्षिण पूर्व आशियातील देशांमध्ये चीन निर्मित ईव्हीशी स्पर्धेसाठी मस्क यांना भारतात ईव्ही कारखाना सुरू करायचा आहे.