लोकशाहीसाठी शिवाजी महाराजांचे मॉडेल आदर्श- इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे
सातवे राष्ट्रभक्ती साहित्य संमलेनाचे उद्घाटन
पुणे, दि.१५ फेब्रुवारी: “२१व्या शतकातील लोकशाही राष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे मॉडल हे आदर्श आहे. त्यासाठी यांचा आदर्श घेऊन समाज निर्मिती करावी. राष्ट्र, समाज व संस्कृतीच्या रक्षणासाठी सिद्ध असणारा आणि कोणत्याही त्यागाला, संघर्षाला कटिबद्ध असणारा समाज घडला तरच उद्याचा भारत दहशतमुक्त, भयमुक्त, भ्रष्टाचार मुक्त,व्यसनमुक्त आणि विज्ञाननिष्ठ परंतु श्रध्दावान संस्कारित समाज निर्माण होईल.” असे विचार सातव्या राष्ट्रभक्ती साहित्य संमलेनाचे अध्यक्ष व भारतीय इतिहास संशोधक समितीचे सचिव पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडख, मुंबई व कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या राष्ट्रभक्ती साहित्य संमलेनाचे उद्घाटन हडपसर येथील साधना विद्यालयात झाले. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलत ते होते.
या प्रसंगी धर्मादाय सह आयुक्त सु.मु. बुक्के हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच स्वागताध्यक्ष डॉ. सुहास पायगुडे , ज्येष्ठ साहित्यिक चंद्रलेखा बेलसरे, रविंद्र बेडकिहाळ, शिक्षणतज्ज्ञ अनुराधा निकम आणि जागतिक कीर्तीचे समुपदेशक डॉ. महेश अभ्यंकर, कर्नल सचिन रंदाळे, साधना विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.जी. जाधव हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच अॅड. नंदीनी शहासने, देशभक्तकोषाकार चंद्रकांत शहासने व मंजिरी शहासने उपस्थित होत्या.
या प्रसंगी चंद्रपूर येथील पंढरी सीतारामजी चंदनखेडे यांना कै. शांताराम भाऊशेट शहासने जीवनगौरव पुरस्काराने प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
पांडुरंग बलकवडे म्हणाले,” देशातील कोणत्याही समाजाने महाराजांची प्रेरणा स्विकारली तर तो समाज महान बनेल. महाराष्ट्रात ६ ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकांची निर्मिती करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुसार राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ३०० कोटी रूपयांची भरीव योजना आखली आहे. सिंदखेड राजा येथे माता जिजाऊचे स्मारक ,रामटेक व मुंबई बरोबरच अन्य ठिकाणी महाराजांचे स्मारक उभारले जाणार आहे. या सर्व कार्यासाठी प्रसिद्ध आर्कीटेक्ट ओजस हिराणी यांनी १ रूपायांच्या मानधनावर कार्य करणार आहेत. ”
सु.मो.बुक्के म्हणाले,” समाजातील ज्या काही समस्या असतील त्या सोडविण्यासाठी आपले काम प्रामाणिकपणे करा. हीच खरी राष्ट्रभक्ती आहे. स्वतःची उन्नती करता करता राष्ट्राची उन्नती करा.”
डॉ. महेश अभ्यंकर म्हणाले,”शब्दांमध्ये सामर्थ असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भाषेचे ज्ञान वाढवावे. छ.शिवाजी महाराजांच्या काळात हर हर महादेव, गांधीजींच्या काळात चले जावो, स्वामी विवेकांनद यांनी बदर्स अॅण्ड सिस्टर्स सारख्या अनेक शब्दांनी राष्ट्रामध्ये जादू निर्माण केली होती. विद्यार्थ्यांनी कौशल्य सामर्थ्य वाढवावे. सक्सेस पेक्षा एक्सलेन्सला महत्व दयावे.”
पुरस्काराला उत्तर देतांना पंढरी चंदनखेड म्हणाले,” चांगले काम करणार्या व्यक्तीची समाजाला गरज आहे. आपल्या कार्याची दखल समाज सतत घेत असतो. त्यातूनच उत्साह वाढून प्रेरणा मिळते. मणुष्याने नेहमी मातृ, पितृ, गुरू देव, समाज आणि राष्ट्राचे ऋण फेडावे.”
त्यानंतर कर्नल व्ही.पी. खाडगे, कर्नल सचिन रंदाळे, चंद्रलेखा बेलसरे, अनुराधा निकम यांनी विचार व्यक्त करून संमेलनाला शुभेच्छा दिल्यात.
प्रस्तावना डॉ. पायगुडे यांनी केले. अॅड. नंदिनी शहासने यांनी स्वागतपर भाषण केले. सूत्रसंचालन व आभार देशभक्तकोषाकार चंद्रकांत शहासने यांनी केले.

