पुणे,दि. ८: मोटार वाहन न्यायालयात दाखल प्रकरणे निकाली काढण्यासाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी विधी सेवा प्राधिकरण आणि पुणे पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने ८ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत वाहतूक शाखा, येरवडा येथे मदत कक्ष (हेल्प डेस्क) सुरू करण्यात येत आहे.
हा कक्ष ३ मार्चपर्यंत सकाळी १०.३० ते सायं. ५ या वेळेत कार्यान्वित राहणार आहे. मदत कक्षाच्या माध्यमातून मोटार वाहन न्यायालयात दाखल असलेल्या दाव्यांबाबत लोकअदालतीच्या पार्श्वभूमीवर पक्षकारांना मदत आणि मार्गदर्शन केले जाईल. त्यामुळे वाहन चालकांना दिलासा मिळेल आणि प्रलंबित दाव्यांची संख्या कमी होईल.
केंद्राचे कामकाज पहाण्यासाठी निवृत्त न्यायिक अधिकारी आणि न्यायालयीन कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीच्या लोकअदालतीच्यावेळी देखील अशा प्रकारच्या कक्षामुळे अनेक वाहनचालकांना त्यांची प्रकरण निकाली काढण्यास मदत .
लोकअदालतीच्या माध्यमातून मोटार वाहन न्यायालयातील एक लाखांहून अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. त्यात मदत केंद्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मदत कक्षाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या संधीचा वाहनचालकांनी फायदा घेऊन त्यांच्यावर दाखल दावे निकाली काढावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी केले आहे.