रोबोकप ज्युनिअर चॅम्पियनशिप स्पर्धेत एस. बी. पाटील स्कूल संघाला इनोव्हेटिव्ह रोबोटचे विशेष पारितोषिक
पिंपरी, पुणे (दि.३१ जानेवारी २०२४) भारतातील युवा पिढी अत्यंत हुशार आणि जिज्ञासू आहे. त्यांना तंत्रज्ञान आत्मसात करून त्यामध्ये संशोधन व विकास करण्याची आवड असते. त्यामुळे रोबोटिक सायन्स मध्ये शिक्षण घेऊन नवनवीन प्रयोग, संशोधन करण्यावर विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. अशा मुलांमधील संशोधन वृत्ती वाढीस लागली पाहिजे या उद्देशाने भारतीय रोबोकप ज्युनिअर फाऊंडेशन कार्यरत आहे असे प्रतिपादन भारतीय रोबोकप ज्युनिअर फाऊंडेशनचे चेअरमन डेव्हिड प्रकाश यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मध्ये इंडियन रोबोकप ज्युनिअर फाउंडेशनच्या सहकार्याने ‘इंडियन रोबोकप ज्युनिअर चॅम्पियनशिप – २४’ दोन दिवसीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी प्राचार्या डॉ.बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी आदी उपस्थित होते. या स्पर्धेत देशभरातील अठरा शाळांमधील पन्नास संघांनी सहभाग घेतला होता.
यामध्ये एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या संघाने इनोव्हेटिव्ह रोबोट डिझाईन प्रकारात विशेष पारितोषिक पटकावले. या संघात रूचिर भोळे, आरूष गर्ग, सुपरश्व बसग्वदार, श्रेयस मंदारे यांचा समावेश होता. परीक्षक म्हणून श्वेता इंगे, दिपाली ढोकणे, प्रवीण नागवकर, ज्ञानदा हिरे यांनी काम पाहिले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.