हडपसर मध्ये क्रेडिट कार्डच्या थकीत बिलावरून एजंटची व्यक्तीला मारहाण:पुण्यात भररस्त्यात घडली घटना; कारवाईची मागणी-खासदार अमोल कोल्हेंनीही व्यक्त केला संताप,विजय कुंभार म्हणाले हे रिकव्हरी एजंट नव्हे हे तर गुंड
पुणे -क्रेडिट कार्डची थकीत रक्कम भरण्यावरून एका खासगी बँकेच्या एजंटकडून एका व्यक्तीला भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. या घटनेवर सर्वसामान्य लोकांकडून तीव्र संताप व्यक्त होत असून, रिकव्हरी एजंटवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. या घटनेमुळे बँकेचे रिकव्हरी एजंट आहेत की गुंड? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
देशात गत काही वर्षांत क्रेडिट कार्डचा वापर झपाट्याने वाढला आहे. ऑनलाइन खरेदी, वैद्यकीय खर्च, प्रवास तसेच दैनंदिन व्यवहारांसाठी अनेकजण क्रेडिट कार्डचा आधार घेत आहेत. मात्र, वेळेवर बिल न भरल्यास वाढणारे व्याज, दंड आणि त्यानंतर सुरू होणारी वसुलीची प्रक्रिया अनेकांसाठी मानसिक त्रासाचे कारण ठरत आहे. बँका आणि वित्तीय संस्थांनी थकबाकी वसुलीसाठी नियमबद्ध व कायदेशीर मार्गांचा अवलंब करणे अपेक्षित असताना, काही ठिकाणी रिकव्हरी एजंटांकडून दमदाटी, धमक्या आणि मारहाणीच्या घटना समोर येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
पुण्याच्या हडपसर परिसरातील अत्यंत वर्दळीच्या 15 नंबर चौकात सोमवारी रिकव्हरी एजंटकडून एका व्यक्तीला मारहाण झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात एका खासगी बँकेचे 2 एजंट एका व्यक्तीला त्याच्या पत्नीसमोर लाथाबुक्क्यांनी मारहाण करताना दिसून येत आहेत. यावेळी पीडित तरुणाची पत्नी व अन्य एक पुरुष या एजंटांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यानंतरही सदर एजंट त्या व्यक्तीला मारहाण करताना दिसून येत आहेत. मारहाणीमुळे सदर व्यक्ती ओक्साबोक्सी रडतानाही दिसून येत आहे. या घटनेनंतर संबंधित खासगी बँकेविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
यासंबंधीच्या माहितीनुसार, एका खासगी बँकेचा रिकव्हरी एजंट थकीत क्रेडिट कार्ड बिलाच्या वसुलीसाठी संबंधित ग्राहकाला भेटण्यासाठी आला होता. दोघांची भेट 15 नंबर चौकात झाली असता सुरुवातीला त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. वसुलीची पद्धत व एजंटच्या बोलण्यावरून हा वाद आणखी चिघळत गेला. त्यानंतर काही क्षणांतच हा वाद विकोपाला जात एजंट व ग्राहक यांच्यात एकच हाणामारी सुरू झाली. त्यानंतर भररस्त्यात रिकव्हरी एजंटने ग्राहकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा प्रकार पाहून परिसरातील वाहनचालक व पादचारी काही काळ स्तब्ध झाले.
गर्दीच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे वाहतुकीलाही काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या या प्रकरणी पुढील चौकशी सुरू असून संबंधितांवर विशेषतः एजंटवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर ‘वसुली’च्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर दादागिरीवर लगाम कधी बसणार? असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनीही या घटनेचा व्हिडिओ शेअर करत राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रिझर्व्ह बँकेने स्पष्टपणे नमूद केले आहे की, वसुली एजंट कर्जदाराला केवळ सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेतच फोन करू शकतात किंवा भेटू शकतात. एजंटांनी कोणत्याही परिस्थितीत शारीरिक किंवा मानसिक छळ, अपमान किंवा मारहाण करणे हा गंभीर गुन्हा आहे. कर्जदाराच्या थकबाकीची माहिती त्याच्या शेजाऱ्यांना किंवा मित्रांना देऊन त्याची बदनामी करता येत नाही.
वसुलीसाठी येणाऱ्या व्यक्तीकडे बँकेने दिलेले अधिकृत ओळखपत्र आणि अधिकृत पत्र असणे अनिवार्य आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने देखील स्पष्ट केले आहे की, बँका केवळ गुंडांच्या जोरावर कर्जाची वसुली करू शकत नाहीत. जर बँकेच्या एजंटने कायद्याचे उल्लंघन केले, तर त्यासाठी संबंधित बँकेला जबाबदार धरले जाईल. या सगळ्या गोष्टी धाब्यावर बसवून हडपसरमध्ये ही मारहाण झाली. राज्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही, याबाबत शंका यावी अशी ही घटना आहे. राज्याच्या गृहखात्याने या घटनेची गांभीर्याने नोंद घ्यावी. सदर वसुली एजंटांवर कारवाई झाली पाहिजेच पण संबंधित बँकेचीही जबाबदारी टाळता येणार नाही. या बँकेवरही योग्य ती कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे.
दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनीही या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. वसुली एजंट्स? ते विसराच. हे तर केवळ ‘फॉर्मल’ कपड्यांमधील गुंड आहेत. पुण्यात, एका ग्राहकाला क्रेडिट कार्डच्या थकबाकीवरून चक्क रस्त्याच्या मधोमध -आणि तेही त्याच्या पत्नीच्या डोळ्यांदेखत – अत्यंत निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. जर वित्त कंपन्या वसुलीसाठी गुंडांचा वापर करत असतील, तर त्या व्यावसायिक परवान्यांच्या नव्हे, तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई होण्याच्याच पात्र आहेत, असे ते म्हणालेत.
काय आहे रिझर्व्ह बँकेचा वसुली संदर्भातील नियम?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, कोणत्याही ग्राहकावर वसुलीसाठी दबाव टाकणे, धमकावणे किंवा सार्वजनिक ठिकाणी अपमानित करणे बेकायदेशीर आहे. त्यानंतरही अनेक प्रकरणांत एजंटकडून दबाव टाकण्याचा व आक्रमक व्यवहार केल्याच्या तक्रारी समोर येतात. पुण्यातील ही घटना याच पठडीत बसणारी आहे.

