साधना कला मंच आयोजित मैफीलीत प्रा. डॉ. मृदुला दाढे यांचे सादरीकरण
पुणे : ‘मालवून टाक दीप’, ‘डौल मोराच्या मानचा रं’, ‘आएगा आनेवाला’, ‘लग जा गले’ अशी लता मंगेशकर यांनी गाऊन अजरामर केलेली एकाहून एक सरस गीते ऐकवत प्रसिद्ध संगीत अभ्यासक, प्रख्यात लेखिका आणि गायिका प्रा. डॉ. मृदुला दाढे व सहकलाकरांनी ‘अमरलता’ मैफलीत रंग भरले. निमित्त होते साधना कला मंच आयोजित संगीत मैफलीचे. कोथरूडमधील हॅप्पी कॉलनी फेडरेशन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लतादिदींची गायकी उलगडून दाखवत त्यांच्या गायकीतील बारकावे रसिकांसमोर मांडण्यात आले.
भारतरत्न, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या केवळ गायिका नव्हे तर अभ्यासक होत्या असे सांगून डॉ. दाढे म्हणाल्या, लतादिदी गाण्यातला भाव, शब्द, भाषा, सूर या सगळ्याचे सखोल चिंतन करत असत. त्यामुळेच लता मंगेशकर हे एक असे पर्व आहे ज्यात अनेक संगीतकारांनी वेगळ्या धाटणीचे संगीत देण्याचे प्रयोग केले. लतादिदी हा अथांग विषय असून त्या एकट्याच गायिकीचे एक घराणे आहेत.
लताबाईंनी स्त्रियांच्या मानसशास्त्राचाही अतिशय नेमका अभ्यास केलेला होता. त्यांच्या आवाजातील पोत त्या अतिशय नेमकेपणाने वापरत. कोणत्या शब्दावर जोर द्यायचा, शब्दांमध्ये भाव कशापद्धतीने वापरायचे, अभिनय या सगळ्यांवर लताबाईंचे प्रभुत्व होते, असेही डॉ. दाढे म्हणाल्या.
‘मोगरा फुलला’ या सुमधुर गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात करत डॉ. दाढे यांनी लतादिदींच्या आवाजातील कंगोरे समजावून सांगताना ‘एहसान तेरा होगा मुझपर’, ‘मेरे नैना सावन भादो’, ‘पिया तोसे नैना लागे’, ‘रिमझिम गिरे सावन’ अशी अनेक सुमधुर गीते प्रभावीपणे सादर केली. निलेश निरगुडकर (सहगायन), प्रवीण फाटक (की-बोर्ड), अमित कुंटे (तबला), व्यंकटेश कुलकर्णी (तालवाद्य) यांनी समर्पक साथसंगत करत मैफलीत रंग भरले.
प्रास्ताविकात संस्थेच्या अध्यक्षा वसुधा कर्दळे यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा सादर केला. तर कोषाध्यक्ष प्रदिप बालगावकर यांच्या हस्ते कलाकारांचा सन्मान करण्यात आला.

