पुणे : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची गायकी अजूनही रसिकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे आयोजित करण्यात आलेल्या हिंदी आणि मराठी गीतांच्या मैफलीत रसिकांनी अवीट गोडीच्या गीतांचा आनंद घेतला.
सुरेल प्रस्तुत ‘डिव्हाईन लता’ या मैफलीचे आयोजन पूना गेस्ट हाऊस येथे करण्यात आले होते. प्रसिद्ध पार्श्वगायिका डॉ. देविका दामले आणि डॉ. मोहिका दामले यांनी लतादीदींची एकाहून एक लोकप्रिय गीते सादर केली. कार्यक्रमाचे आयोजन पूना गेस्ट हाऊसचे संचालक डॉ. किशोर सरपोतदार यांनी केले होते तर संयोजन अजित कुमठेकर यांनी केले होते. कार्यक्रमाची निर्मिती, संकल्पना, संहिता आणि निवेदन डॉ. गौरी दामले यांचे होते. ल म्हणजे लय आणि ता म्हणजे ताल अशी ज्यांची फोड होते त्या म्हणजे लतादीदी असे सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला.
पेशाने डॉक्टर असलेल्या या भगिनींनी आपल्या सुरेल सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. ‘सत्यम, शिवम सुंदरम’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करत ‘आएगा आनेवाला’, ‘नैना बरसे रिमझिम रिमझिम’, ‘हवा मे उडता जाए’, ‘चंदन सा बदन’, ‘जीवनात ही घडी’, ‘अपलम-चपलम’, ‘लटपट-लटपट तुझं चालणं’, ‘इक प्यार का नगमा है’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘असा बेभान हा वारा’, ‘सुन्या सुन्या मैफीलीत माझ्या’, ‘लग जा गले’ अशी एकाहून एक सरस आणि लोकप्रिय गीते सादर करण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रचलेल्या ‘हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा’ या शिवस्तोत्राने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. विविध गीतकारांनी लिहिलेल्या आणि तितक्याच ताकदीच्या संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या या हिंदी-मराठी रचना सादर करणाऱ्या या भगिनींना उपस्थितांनी वन्स मोअर देत कार्यक्रमाचा आनंद लुटला.
प्रसिद्ध गायक राजेश दातार, अनिल घाटगे, प्रसिद्ध तबलावादक पंडित रामदास पळसुले, सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, प्रदिप देसाई, डॉ. सतीश देसाई, धनंजय दैठणकर, आनंद सराफ, दिलीप कुंभोजकर, अभय नाझरे, विवेक जडे, सतीश दवे आदी मान्यवर उपस्थित होते.

