पुणे -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणे महानगरपालिका आयुक्तांकडे क्षेत्रीय कार्यालये आणि परिमंडळांच्या नवीन रचनेविरोधात लेखी तक्रार केली आहे. ही रचना राजकीय हेतूने प्रेरित असून, एका विशिष्ट राजकीय पक्षाला फायदा पोहोचवण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जाणीवपूर्वक अन्याय करण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप पक्षाने केला आहे.
महापालिका प्रशासनाने नवीन प्रभाग रचनेनुसार क्षेत्रीय कार्यालये आणि परिमंडळांची पुनर्रचना केली आहे. मात्र, या रचनेमुळे काही प्रभागांना पूर्वी जवळ असलेली क्षेत्रीय कार्यालये बदलून दूरच्या कार्यालयांशी जोडण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना दैनंदिन कामांसाठी अधिक अंतर प्रवास करावा लागणार आहे.
या चुकीच्या रचनेमुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागेल, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. प्रशासनाने जाणीवपूर्वक ही चुकीची रचना केल्याने, प्रशासन पुणेकरांसाठी काम करत आहे की विशिष्ट राजकीय पक्षासाठी, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला आहे.
यावेळी पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, सुभाष जगताप आणि गटनेते निलेश निकम उपस्थित होते. त्यांनी आयुक्तांना हे तक्रारपत्र सादर केले.
तक्रारपत्रात असेही म्हटले आहे की, मनपा आयुक्त पंतप्रधान कार्यालयातून महापालिका आयुक्तपदी आल्याने त्यांच्याकडून पुणेकरांच्या हितासाठी चांगल्या कामाची अपेक्षा होती. मात्र, त्यांनी यापूर्वी महापालिकेची प्रभाग रचनाही एका विशिष्ट राजकीय पक्षाला फायदेशीर ठरेल अशा पद्धतीने केली होती. आता क्षेत्रीय कार्यालये आणि प्रभाग समित्यांच्या रचनेतही तेच काम पुन्हा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
यामुळे पुणेकरांचा आयुक्तांवरील विश्वास कमी होत चालला आहे, असे पत्रात नमूद आहे. आयुक्तांनी निःपक्षपातीपणे काम करत असल्याचे दाखवून देण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी क्षेत्रीय कार्यालये आणि प्रभाग समित्यांच्या रचना तातडीने दुरुस्त करून नव्याने जाहीर कराव्यात, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

