पुणे, दि. 27 फेब्रुवारी – अन्न व औषध प्रशासन विभाग, पुणे कार्यालयास प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार प्रतिबंधित अन्नपदार्थांवर धडक कारवाई करण्यात येऊन एकूण ९२ लाख ९८ हजार ८१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पहिल्या कारवाईत में. आझमी वेट ब्रिज, गट नं. ५७४/२०१६, महाळुंगे एमआयडीसी, ता. खेड, जि. पुणे येथे विक्री व वितरणासाठी साठवून ठेवलेला गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. या ठिकाणी बोलेरो मॅक्स पिकअप (क्र. MH-12XM-46908) वाहनासह एकूण ७९ लाख १७ हजार १३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी वाहन मालक सिराज नूर आलम व अज्ञात जागा मालक यांच्या विरोधात महाळुंगे पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. ०१३६/२०२६ नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दुसऱ्या कारवाईत आनंद सेल्स, थेरगाव, पिंपरी-चिंचवड येथे गुटखा व पान मसाला वाहतूक करणारे वाहन (क्र. MH-14-JP-0743) पकडण्यात आले. येथे १३ लाख ८० हजार ९५० रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. वाहन मालक प्रज्वल सुदर्शन मुथा व रामस्वरूप यांच्या विरोधात वाकड पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. ००९१/२०२६ नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत सदर कारवाई करण्यात आली असून नागरिकांनी प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या विक्रीबाबत माहिती मिळाल्यास प्रशासनास कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

