कै. तिलोत्तमा निफाडकर स्मृती कर्मयोगिनी पुरस्काराने प्रभा सोनवणे यांचा गौरव
पुणे : शेतकरी कुटुंबातून आलेल्या मला गृहिणी व्हायचे होते पण कवयित्री झाले. कविता हा माझा जगण्याचा आता अविभाज्य भाग झाला असून कविता हाच माझा कर्मयोग आहे, असे भावपूर्ण उद्गार ज्येष्ठ कवयित्री प्रभा सोनवणे यांनी व्यक्त केले. कवितेमुळे आयुष्य सुसह्य झाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
कै. सौ. तिलोत्तमा प्रकाश निफाडकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या कर्मयोगिनी पुरस्काराने प्रभा सोनवणे यांचा गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. पुरस्काराचे वितरण तनुजा चव्हाण आणि नितीन चव्हाण यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ कवयित्री मृणालिनी कानिटकर-जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांची प्रमुख उपस्थिती हाती. सदाशिव पेठेतील अक्षरवेल सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून संस्काराची शिदोरी पुढे नेली जात आहे, असे सांगून मृणालिनी कानिटकर-जोशी म्हणाल्या, प्रभा सोनवणे यांच्या बोलण्यात ऋजुता असून त्या सौंदर्यप्रेमी आहेत. त्यांच्या विचारात प्रगल्भता आहे तर त्यांची कविता चित्रमय आहे.
ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, कविता जगण्याला उभारी देण्याचे काम करते. अनुभव संपन्नतेतून काव्य फुलते हे प्रभा सोनवणे यांच्या काव्यातून दिसून येते. त्यांची कविता समृद्धतेच्या मार्गाने जात आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त निमंत्रितांचे काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते यात अंजली कुलकर्णी, मंजुषा आचरेकर, जयंत भिडे, वासंती वैद्य, प्रमोद खराडे, वैजयंती आपटे, माधव हुंडेकर, ऋचा कर्वे, स्वाती यादव, चैतन्य दीक्षित यांचा सहभाग होता.
प्रास्ताविकात तनुजा चव्हाण यांनी पुरस्कारामागील भावना ‘सांगा कधी शब्दांमध्ये मांडता येते का आई;
मांडू शकेन इतका कुणी गुणवंत नाही’ अशा शब्दात विशद केल्या. सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले तर आभार नितीन चव्हाण यांनी मानले.

