गतिमान विकासाद्वारे पुणे कोंडीमुक्त ,प्रदूषण मुक्त पुणे करण्याचा निर्धार

Date:

पुणे- शहरातील शहरी गतिशीलता सुधारण्यासाठी अल्पकालीन उपाय, बिग डेटा वापर, स्वच्छ हवा व TOD आधारित सर्वसमावेशक धोरणावर भर देऊन पुणे कोंडीमुक्त ,प्रदूषण मुक्त पुणे करण्याचा निर्धार आज येथे व्यक्त करण्यात आला .दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे शहरातील Urban Mobility (शहरी गतिशीलता) या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले. ही कार्यशाळा पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार घेण्यात आली असून पुणे महानगरपालिकेतील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यशाळेला महापौर मनीषा नागपुरे, उपमहापौर, सभागृह नेते श्री गणेश बिडकर तसेच विरोधी पक्षनेते श्री निलेश निकम यांनी उपस्थिती दर्शवून आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी येत्या काळात पुणे शहरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद व सुलभ करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, असा आग्रह धरला.

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांनी सांगितले की, सन २०२६ साठी रस्ते विकास व वाहतूक सुधारणा यासाठी पुणे महानगरपालिका इतर शासकीय विभागांसोबत समन्वयाने काम करणार आहे. वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी वाहतुकीशी संबंधित बिग डेटा (Big Data) चा वापर करून ट्रॅफिक पॅटर्न, गर्दीची ठिकाणे आणि समस्या ओळखून उपाययोजना केल्या जातील. तसेच भविष्यातील भांडवली खर्चिक (capital intensive) प्रकल्प रणनीतीपूर्वक व दीर्घकालीन दृष्टीने राबविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यशाळेत शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी येत्या वर्षात व पुढील काळात पुण्यातील वाहतूक परिस्थिती सुधारण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत सविस्तर सादरीकरण केले. तसेच मुख्य अभियंता राजेश बनकर आणि प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता दिनकर गोजारे यांनी एका वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या उपयोजनांची माहिती दिली.

यावेळी पोलीस अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील यांनी वाहतूक शिस्त, अंमलबजावणी आणि तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आयआयटीएम (IITM) संस्थेच्या प्रतिनिधींनी पुणे शहरातील हवेच्या गुणवत्तेबाबत (Air Quality) महत्त्वपूर्ण माहिती सादर केली.

कार्यशाळेमध्ये स्वच्छ हवा (Clean Air) या विषयाचे विशेष महत्त्व अधोरेखित करण्यात आले. खासगी वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतूक, बस व मेट्रोचा वापर वाढविल्यास उत्सर्जन व प्रदूषणात लक्षणीय घट होऊ शकते, यावर सखोल चर्चा झाली. यासोबतच पुणे शहरात जे. एम. रोड, एफ. सी. रोड यांसारखे अधिक रस्ते पादचारी, सायकलस्वार आणि सार्वजनिक जीवनासाठी अनुकूल ‘स्ट्रीट्स’ म्हणून विकसित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

दुपारच्या सत्रामध्ये विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांच्या तज्ज्ञांनी शहरी वाहतूक व्यवस्थेतील सर्वोत्तम पद्धती (best practices) मांडल्या. सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट (CRRI), Oasis Designs, Design Point (अहमदाबाद), तसेच RKD संस्थेच्या प्रतिनिधींनी अंमलबजावणीयोग्य उपाययोजनांबाबत आपले अनुभव सादर केले.

याच सत्रामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स (NIUA), नवी दिल्ली या संस्थेमार्फत UrbanShift उपक्रमांतर्गत पुणे महानगरपालिकेसोबत Transit Oriented Development (TOD) संदर्भात सुरू असलेल्या कामाची माहिती देण्यात आली. TOD साठी मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines) विकसित करणे, स्टेशन एरिया प्लॅन तयार करणे आणि शिवाजीनगर मेट्रो स्टेशन परिसरात पायलट प्रकल्प राबविणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले.

याच अनुषंगाने वाहतूक नियोजक निखिल मिजार यांनी TOD या विषयावर पुण्यातील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक व वास्तुविशारदांसोबत संवाद साधला. या चर्चेमध्ये मेट्रो स्टेशनच्या परिसरातील विकास व विशेषतः पुनर्विकास (Redevelopment) या विषयांवर सविस्तर विचारमंथन करण्यात आले. या संवादात CREDAI, MBVA, NAREDCO, AESA तसेच IIA या संस्थांचे तज्ज्ञ सहभागी झाले असून, खासगी क्षेत्राच्या दृष्टीकोनातून TOD अंमलबजावणीसाठी उपयुक्त सूचना मांडण्यात आल्या.

या कार्यशाळेदरम्यान विविध हितधारकांनी (stakeholders) मांडलेल्या सूचना व कल्पना नोंदविण्यात आल्या असून त्या स्टेशन एरिया मोबिलिटी प्लॅनमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत.

तसेच पुणे महानगरपालिकेसोबत जवळून काम करणाऱ्या विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी आणि Global Traffic Solutions संस्थेचे श्री प्रताप भोसले यांनीही प्रत्यक्ष अंमलबजावणीयोग्य उपायांवर सादरीकरण केले.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य अभियंता (प्रकल्प) दिनकर गुजारे आणि वाहतूक नियोजक निखिल मिजार यांनी केले.

अशा स्वरूपाच्या कार्यशाळा प्रत्येक विभागाने नियमितपणे आयोजित कराव्यात तसेच पुणे महानगरपालिकेतील सर्व अभियंत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेऊन येणाऱ्या वर्षात महानगरपालिकेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कविता हाच माझा कर्मयोग : प्रभा सोनवणे

कै. तिलोत्तमा निफाडकर स्मृती कर्मयोगिनी पुरस्काराने प्रभा सोनवणे यांचा गौरव पुणे :...

चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्यात यावा

आ सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल...

टीओडी वीजमीटरमुळे पुणेकरांना मिळाली साडेआठ कोटींची सवलत

पुणे, दि. १७ फेब्रुवारी २०२६- टीओडी वीजमीटर बसविणाऱ्या वीज ग्राहकांना...

पुणे पोलीस दलात १७६६ जागांवर भरती सुरु, अर्ज आले १ लाख ३९ हजार

पुणे-पुणे शहर पोलीस दलात १६३३ + १३० पदांसाठीची भरती...