मालेगाव -मालेगावातील उपमहापौरांच्या दालनातील छायाचित्र प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. उपमहापौर शान-ए-हिंद निहाद अहमद यांनी दालनाच्या दुरुस्तीनंतर टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा लावण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका जाहीर केल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापू लागले आहे. यापूर्वी तणाव वाढू नये म्हणून प्रशासनाने तो फोटो हटवला होता. मात्र स्वागत समारंभात बोलताना उपमहापौरांनी आपली भूमिका बदललेली नसल्याचे सांगितले. इंग्रजांविरुद्ध लढलेल्या योद्ध्याचे छायाचित्र लावण्यात चुकीचे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या वादात आता नव्या आरोप-प्रत्यारोपांची भर पडली आहे. मी ओबीसी वर्गातून आलेली आहे, म्हणून मला टार्गेट केले जात आहे, असा आरोप शान-ए-हिंद यांनी केला. संविधानात टिपू सुलतान यांचा उल्लेख आहे, असे सांगत त्यांनी आंदोलन करणाऱ्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्यांचा उल्लेख संविधानात आहे, त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यास परवानगी कशी दिली जाते? असा सवाल त्यांनी केला. तसेच संविधानात ज्यांचा फोटो आहे, तो हटवण्याचा अधिकार भाजप किंवा इतरांना कोणी दिला? असे म्हणत त्यांनी थेट राजकीय विरोधकांवर निशाणा साधला.
उपमहापौरांनी पुढे टिपू सुलतान यांच्या सैन्यरचनेचा उल्लेख करत नवा मुद्दा मांडला. त्यांच्या म्हणण्यानुसार, टिपू सुलतान यांच्या सैन्यातील अनेक प्रमुख अधिकारी ब्राह्मण होते. त्यामुळे त्यांच्याबाबत एकांगी चित्र रंगवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दालनात फोटो लावल्यानंतर त्यांच्या कार्याची माहिती अनेकांना कळाली, असे सांगत त्यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले. या विधानामुळे वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या प्रकरणाची पार्श्वभूमीही तितकीच गाजलेली आहे. शान-ए-हिंद यांनी उपमहापौरपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर काही दिवसांतच दालनात टिपू सुलतान यांचे छायाचित्र लावण्यात आले होते. त्यानंतर विविध राजकीय पक्ष आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेत आंदोलनाची भूमिका घेतली. सोशल मीडियावर दालनातील व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रकरण अधिकच गाजले. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने हस्तक्षेप करून फोटो हटवण्याचे आदेश दिले आणि परिस्थिती तात्पुरती शांत झाली.
मात्र आता उपमहापौरांच्या नव्या घोषणेमुळे वाद पुन्हा उफाळण्याची चिन्हे दिसत आहेत. काहींनी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे, तर काहींनी आंदोलन पुन्हा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. शहरात शांतता राखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. एकूणच, दालनातील एका छायाचित्रावरून मालेगावच्या राजकारणात पुन्हा एकदा उकळी आली असून पुढील काही दिवसांत या वादाचे नवे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

