पर्वतीवरील विकास कामांची पाहणी व “नानासाहेब पेशवे” यांच्या समाधीस अभिवादन
पुणे–“पर्वती” टेकडीला मोठा ऐतिहासिक वारसा असून ही टेकडी पुण्याचे वैभव आहे, ते टिकविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे वचन ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. त्यांनी आज पर्वतीवर श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले, तसेच येथे उभारण्यात आलेल्या श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी करतानाच आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या विकासनिधीतून केल्या जात असलेल्या विविध विकास कामांची ही पाहणी केली व त्या कामांची प्रशंसा करतानाच कार्य प्रगती बद्दल समाधान व्यक्त केले. त्यांच्या समवेत देवदेवेश्वर संस्थान चे अध्यक्ष रमेश भागवत, भाजप चे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, गिरीश खत्री व इतर मान्यवर उपस्थित होते. श्री. भागवत यांनी पर्वतीचा संपूर्ण इतिहास समजावून सांगताना कार्तिक स्वामी मंदिर, देवदेवेश्वर मंदिर, संग्रहालय, सदरेतील गणपती, पर्वताई देवी इ स्थळांची माहिती दिली. तसेच याठिकाणी युद्ध स्मारक उभारण्याचा संकल्प असून निधीची प्रतीक्षा आहे असे सांगताच मा. चंद्रकांतदादांनी त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे वचन दिले. मला पेशव्यांचा इतिहास ज्ञात असून नानासाहेब पेशवे यांनी आधुनिक पुणे उभारले,पहिली भूमिगत पाणीपुरवठा योजना, तळ्यातला गणपती, लकडी पूल, शनिवारवाड्याचे सुशोभिकरण यासह अनेक व्यापारी पेठांची उभारणी त्यांनी केली आहे.म्हणून त्यांचे यथोचित स्मारक व्हावे आणि त्यांनी उभारलेल्या पर्वतीस गत वैभव प्राप्त व्हावे यासाठी मी कटीबद्ध असल्याचे ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले.