मंगळवारपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत ३५ देशांतील २८ संघांत विजेतेपदासाठी चुरस

Date:

पुणे, दि. १९ बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेअंतर्गत आजच्या प्रोलॉग रेसने आयोजनातील भव्यता आणि जागतिक स्तरावरील दर्जा अधोरेखित केला. जगभरातील ३५ देशांतील २८ नामवंत संघांचे १६४ आंतरराष्ट्रीय सायकलपटू या स्पर्धेत सहभागी होत असून, सह्याद्रीच्या घाटरस्त्यांवरून सुमारे ४३७ किलोमीटरचा आव्हानात्मक प्रवास करत विजेतेपदासाठी प्रयत्न करणार आहेत.

स्पर्धेचा उत्साहवर्धक पूर्वरंग असलेली ७.५ किलोमीटरची प्रोलॉग (टाइम ट्रायल) रेसला दुपारी १.३० वाजता सुरूवात झाली. शहरातील नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक येथे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पहिल्या स्पर्धकाला हिरवा झेंडा दाखवत अधिकृत सुरुवात केली. यावेळी, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, राज्य क्रीडा व युवक कल्याण आयुक्त श्रीमती शीतल तेली- उगले, जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह मान्यवर अधिकारी उपस्थित होते.

या प्रोलॉग रेसमध्ये स्पर्धकांनी वैयक्तिक स्वरूपात एकामागोमाग एक मिनिटाच्या अंतराने सुरुवात केली. ही मास स्टार्ट रेस नसून, प्रत्येक सायकलपटूची वैयक्तिक वेळ निर्णायक ठरणार आहे. पुणेकर नागरिकांनी शहरातील मध्यवर्ती रस्त्यांवरून जाणाऱ्या सायकलपटूंचे उत्साहात स्वागत केले.

स्पर्धेच्या पुढील टप्प्यांमध्ये आशिया खंडातील ७८, युरोपमधील ६९, तर ओशनिया, अमेरिका आणि आफ्रिका खंडांतील सायकलपटू सहभाग घेत आहेत. भारताचा इंडियन डेव्हलपमेंट संघही या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाला असून, देशांतर्गत सायकलिंगसाठी ही स्पर्धा मैलाचा दगड ठरणार आहे.

सुरक्षेच्यादृष्टीने स्पर्धा मार्गावर सुमारे १ हजार ५०० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. यामध्ये स्थानिक पोलीस, गुन्हे शाखा, विशेष शाखा, बॉम्ब नाशक पथक तसेच शीघ्र कृती दलाचा समावेश होता. वाहतूक व्यवस्थापनासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले. आपत्कालीन वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका आणि तांत्रिक सहाय्य पथकेही सज्ज ठेवण्यात आली होती.

मंगळवार २० जानेवारी ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत पार पडणारी बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ ही स्पर्धा पुणे व परिसराच्या क्रीडा, पर्यटन आणि जागतिक ओळखीला नवे परिमाण देणारी ठरणार आहे. आजचा प्रोलॉग हा या भव्य आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा केवळ पूर्वरंग असून, पुढील दिवसांत सह्याद्रीच्या घाटरस्त्यांवर रंगणारी चुरस अधिक उत्कंठावर्धक ठरणार आहे.

ढोल-ताशांचा निनाद आणि शिवगर्जना
स्पर्धेच्या शुभारंभाच्यावेळी नामदार गोपाळकृष्ण गोखले परिसर ढोल-ताशांच्या गजराने दुमदुमून गेला होता. “छत्रपती शिवाजी महाराज की जय”च्या गगनभेदी घोषणांनी वातावरणात एक वेगळीच ऊर्जा संचारली. पारंपरिक मराठमोळ्या तालावर पुणेकरांनी आंतरराष्ट्रीय सायकलपटूंचे जल्लोषात स्वागत केले. भारतीय खेळाडूंचे नाव उच्चारताच टाळ्यांच्या कडकडाट करून त्यांनी खेळाडूंचा उत्साह वाढविला.

▪️ जागतिक खेळाडूंना पुणेकरांच्या आदरातिथ्यासोबत उत्साह आणि क्रीडाप्रेमाचा परिचय देत नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. मोबाईलवर खेळाडूंचे छायाचित्र घेण्यासाठी युवकांनी गर्दी केली हेाती. खेळाडूंना चिअरअप करीत क्रीडाप्रेमींनी विविध देशांतील सायकलपटूंना प्रोत्साहन दिले. पुणेकरांचा हा प्रेमळ प्रतिसाद पाहून अनेक खेळाडूंनी हात हलवून अभिवादन स्वीकारले.

स्पर्धेचा रंग वाढवणारा ‘मस्कॉट’
बजाज पुणे ग्रँड टूरचे रंगीत बोधचिन्ह उपस्थितांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. मस्कॉटसोबत सेल्फी घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. क्रीडा स्पर्धेला उत्सवाचे स्वरूप देणारा हा क्षण सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा ठरला. यानिमित्ताने महाराष्ट्राचा ‘शेकरू’ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला. निसर्ग आणि खेळ यांच्यातील नाते घट्ट करणारी ही स्पर्धा असून ‘इंदू’ त्याचेच प्रतिक आहे. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यातून वावरणारा शेकरू या वाटेने येणाऱ्या सायकलपटूंच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.

परंपरा आणि आधुनिकतेचा सुरेख संगम
मराठमोळा पोशाख, भगवे फेटे, ढोल-ताशे आणि त्याचवेळी आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकल रेस—या सगळ्यांचा सुरेख संगम पुण्याच्या रस्त्यांवर पाहायला मिळाला. परंपरेचा सन्मान राखत आधुनिक क्रीडासंस्कृतीला चालना देणाऱ्या या स्पर्धेच्या निमित्ताने पर्यटनाला चालना मिळणार आहे. यानिमित्ताने पुणेकरांच्या आदरातिथ्याचा अनुभवही जगभरातील खेळाडूंना घेता येईल. त्याची सुरेख सुरूवात या मराठमोळ्या स्वागताने झाली.

माध्यमांचा मोठा सहभाग
देश-विदेशातील माध्यम प्रतिनिधी, कॅमेरामन आणि छायाचित्रकारांनी प्रत्येक क्षण टिपण्यासाठी गर्दी केली होती. ‘पुणे ग्रँड टूर’चा प्रत्येक सेकंद जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा उत्साह माध्यमांमध्येही दिसून आला.

पुणे—खेळांची जागतिक राजधानी होण्याची चाहूल
आजचा प्रोलॉग केवळ शर्यतीचा प्रारंभ नव्हता, तर पुणे शहर जागतिक क्रीडा नकाशावर अधिक ठळकपणे अधोरेखित करणारा उत्सव ठरला. सायकलिंगच्या क्षेत्रात सायकलचे शहर म्हणून एकाकाळी परिचीत असलेल्या पुण्याची ही ओळख नव्याने स्थापित होणार आहे. पुणेकरांनी मोठ्या संख्येने आजच्या स्पर्धेला उपस्थित रहात या सायकल आणि खेळाप्रती असणाऱ्या प्रेमाचे दर्शन घडविले.

जिल्हा प्रशासनाच्या अथक प्रयत्नांचे फलित
मागील दोन महिन्यांपासून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा बजाज पुणे ग्रँड टूरच्या यशस्वी आयोजनासाठी अहोरात्र कार्यरत आहे. विविध विभागांमधील समन्वय, काटेकोर नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे भव्य व सुस्थितीत आयोजन शक्य झाले. या परिश्रमांचे चीज होत असल्याची समाधानाची भावना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होती. देशातील पहिलीच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकजण आपापली भूमिका उत्साहाने पार पाडत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दिलेला शब्द २४ तासात पूर्ण; हिराबाग सोसायटीतील कचऱ्याची समस्या राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सोडविली

पुणे:हिराबाग हाउसिंग सोसायटी येथील एसआरए प्रकल्पातील अस्वच्छतेचा प्रश्न अवघ्या...

UAE अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयानांचे मोदींनी प्रोटोकॉल मोडून केले स्वागत

-म्हणाले- माझ्या भावाला घ्यायला आलो; नाहयान फक्त 90 मिनिटे...

महापौर आरक्षणाची सोडत २२ जानेवारी रोजी

पुणे- राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौर पदाचे आरक्षण निश्चितीसाठी आरक्षणाची...