बासरीचे स्वर्गीय स्वर, मोहिनी अट्टमची मोहिनी आणि सुश्राव्य गायनातून रसिक आनंदले
एसएनबीपी आयोजित ‘स्वरयज्ञ’ संगीत महोत्सव
पुणे : पद्मविभूषण हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरीच्या स्वर्गीय स्वरवर्षाव, मोहिनीअट्टम नृत्याची मोहिनी तर बनारसी घराण्याचे सुश्राव्य गायनाने ‘स्वरयज्ञ’ सांगीतिक मैफल रंगली. पूर्व पुण्यातील यंदाचा महोत्सव सांगीतिक पर्वणी ठरला आहे.
एसएनबीपी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि एस. ई. सोसायटी या येरवडा परिसरातील प्रतिष्ठीत शैक्षणिक संस्थेतर्फे ‘स्वरयज्ञ’ संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गेली अनेक दशके ज्यांच्या बासरीच्या सुरांनी रसिकांना स्वर्गीय आनंद दिला आहे, अशा जगविख्यात बासरी वादक पद्विभूषण पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरी वादनाची मैफल ही या ‘स्वरयज्ञा’चा कळसाध्याय ठरली.
सुरुवातीस प्रसिद्ध समाजसेवक पद्श्री गिरिश प्रभुणे, एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूच्या अध्यक्ष डॉ. वृषली भोसले, संचालिका देवयानी भोसले, ॲड. ऋतुजा भोसले, पंडित अरविंदकुमार आझाद, डॉ. रिटा देव, तुषार केळकर, प्रिन्सिपल रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन झाले.
कार्यक्रमाची सुरुवात त्रिवेंद्रम (केरळ) येथील नाट्यविध महाविद्यालयाच्या कलाकारांनी मोहिनीअट्टम नृत्याविष्कारातून गणेश वंदना सादर केली. त्यानंतर आदिशक्तीच शाश्वत स्त्रोत दर्शविणारी नृत्यप्रस्तुती करण्यात आली. सुकुमार भगवान श्रीकृष्ण आणि गोपिकांच्या शृंगाराचे दर्शन घडविणारे नृत्य सादरीकरण रसिकांना विशेष भावले. नृत्यप्रस्तुतीची सांगता करताना ऋतुचक्राचे महत्त्व अधोरेखीत करत आजच्या काळात निसर्गाचा होत असलेला ऱ्हास त्यातून निर्माण झालेले पर्यावरणारचे प्रश्न या विषयी प्रभावी सादरीकरण करण्यात आले. लास्य आणि भावांचे सुंदर मिश्रण असणाऱ्या या नृत्याविष्कारात पद्मा, रश्मी, चित्रा, उमा, नवमी यांचा सहभाग होता.
दुसऱ्या सत्रात बनारस घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका डॉ. रिटा देव यांचे सुमधुर गायन झाले. त्यांनी राग बिहाग मधील खयाल सादर करताना ‘परि हो पिया’ ही बंदिश सादर केली. द्रुत लयीत ‘झनन झनन मोरि बाजे पायलिया’ ही पारंपरिक रचना बहारदारपणे सादर केली. मिश्र खमाजमधील ‘का रे मतवारी मन हर ली ना शाम, मद के भरे तोरे नैना’ ही श्रीकृष्णाच्या डोळ्यांचे समर्पक वर्णन करणारी ठुमरी ऐकवून डॉ. रिटा देव यांनी आपल्या गायनाची भुरळ रसिकांच्या मनावर अच्छादिली. त्यांना पांडुरंग पवार (तबला), तुषार केळकर (संवादिनी) यांनी सुरेल साथसंगत केली.
स्वरयज्ञाची सांगता होत असताना स्वरमंचावर पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचे आगमन झाले तेव्हा श्रोत्यांमधील प्रत्येक व्यक्तीने आदराने उभे राहून त्यांना टाळ्यांच्या गजरात मानवंदना दिली. पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी मारू बिहाग रागतील आलाप, झपताल आणि तीन तालात निबद्ध रचना ऐकवून रसिकांना संमोहित केले. त्यांच्या बासरीचे सुर रसिकांच्या मनात रेंगाळत राहिले आणि या मैफलीची सांगताच होऊ नये असे भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटले म्हणूनच खास रसिकांच्या आग्रहावरून पंडित चौरासिया यांनी ‘ॐ जय जगदिश हरे’ या भजनाची धून रसिकांना ऐकविली. त्याला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात साथ दिली. पंडित अरविंदकुमार आझाद यांनी तबल्यावर समर्पक साथसंगत केली. ‘स्वरयज्ञाना’ला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
पद्श्री गिरिश प्रभुणे म्हणाले, इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या महोत्सवाच्या माध्यमातून रागदारीवर आधारित उत्तम भारतीय शास्त्रीय संगीत अनुभवायला मिळते आहे ही समाधानाची गोष्ट आहे. या स्वरयज्ञानाच्या माध्यमातून संस्कृतीची पाळेमुळे रूजण्यास मदत होईल.
कलाकारांचा सत्कार डॉ. वृषली भोसले, देवयानी भोसले, डॉ. ॲड. ऋतुजा भोसले, रश्मी शुक्ला यांनी केला.
पूर्व पुणे भागातील रसिकांसाठी ‘स्वरयज्ञ’ ठरली सांगीतिक पर्वणी
Date:

