“राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे” आयोजन
पुणे-जम्मू काश्मीर मध्ये आतंकवादाचा परिणाम हा थेट महिला आणि मुले यांच्यावर होत असतो. एक महिलाच घराला स्थैर्य देऊ शकते. ज्याठिकाणी महिलेस प्राधान्य मिळत नाही ती अस्वस्थ होते आणि त्याजागी अशांतता नांदत असते. आतंकवाद संपविण्यासाठी महिलांचे शिक्षण आणि सक्षमीकरण महत्वाचे आहे. महिलांनी शिक्षण घेऊन पुन्हा काश्मीर मध्ये जाऊन वास्तव्य केले पाहिजे यासाठी “बसेरा ई तबस्सुम “हा उपक्रम काश्मीर मध्ये आम्ही राबवत आहे.याद्वारे अनेक मुली शिक्षण घेऊन कुटुंब सुव्यवस्थित करू शकतील. पुढील पिढीतील मुलांच्या मागे खंबीरपणे पाठबळ देण्यासाठी हे आवश्यक आहे. काश्मीर मध्ये बदल घडवण्यासाठी ही दीर्घकालीन योजना असल्याचे मत बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे प्रमुख अधिक कदम यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे ” राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे” आयोजन गांधी भवन कोथरूड याठिकाणी करण्यात आले आहे. यामध्ये” काश्मीर आणि मी “या विषयावर बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे प्रमुख अधिक कदम यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी माजी सनदी अधिकारी आणि ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, विश्वस्त सचिव अन्वर राजन, एम एस जाधव,नीलिमा जोशी, स्वप्नील तोंडे, तेजस भालेराव उपस्थित होते.
अधिक कदम म्हणाले, १९९७ मध्ये मी काश्मीर मध्ये कुपवाडा जिल्ह्यात एका गावात युनिसेफ प्रकल्प होता त्यासाठी बहिणी भारती सोबत गेलो होतो. त्यावेळी एका संध्याकाळी आम्ही दुचाकी गाडीवर जात असताना तीन जण मला रस्त्यात भेटले आणि त्यांच्या हातात एके ४७ सारखे काहीतरी संशयास्पद दिसले लवकरच ते आतंकवादी असल्याचे स्पष्ट झाले. माझी गाडी काहीजणांनी अडवली आणि सामानाची तपासणी केली. त्यांच्याशी बोलताना त्यातील एकजण पुण्यात भारती महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणास प्रवेश घेण्यासाठी आला होता असे समजले. नंतर तो काश्मीर मध्ये गेल्यावर काहीजणांच्या संपर्कात येऊन पाकिस्तानला गेला आणि त्याचा आयुष्याचा मार्ग बदलला. त्यांनी आम्हाला जीवे मारणार नाही असे सांगितले. मात्र, या घटनेमुळे माझे देखील जीवन बदलले. काश्मीर माझ्यासाठी गुरू स्थानी आहे. वयाच्या १८ व्या वर्षी मी काश्मीरला गेलो.त्यानंतर मागील २९ वर्षात मी काश्मीर मध्ये अनेकवेळा गेलो पण कधी हॉटेल मध्ये राहिलो नाही तर स्थानिक लोकांच्या घरी राहिलो. वेगवेगळ्या गावात जाऊन लोकांच्या घरात राहून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. काश्मीर आणि मी विषयावर बोलताना मला जाणवते की, “मी” हा अहंकारी शब्द असून प्रत्येकजण आपापल्या परीने काश्मीर मध्ये लक्ष्य घालत असल्याने अनेक अडचणी वाढल्या आहे.बुलेटचा कोणता धर्म नसून त्याला केवळ लक्ष्य भेद करणे माहिती असते. मला जीवे मारण्यासाठी दोन ते तीन वेळा प्रयत्न झाला पण माझ्या कामामुळे आणि स्थानिक सहकार्य यामुळे माझी सुटका झाली. काश्मीर मधील माझ्या कामाचा प्रवास हा त्या त्याक्षणी उभे राहण्याची क्षमता यामुळे लोकांची कामे करू शकत आहे. काश्मीर मध्ये बोगस स्वयंसेवी संस्था यामुळे खराब परिस्थिती काही प्रमाणात झाली आहे. त्याठिकाणी आम्ही चांगले काम उभे करू शकलो. काश्मीर मध्ये सध्या तीन तुकडे झाले असून पाकिस्तान, भारत आणि चीन सगळेच आपापले हक्क सांगत आहे. भारताकडे काश्मीरचा मोठा भाग आहे. आपल्याला जम्मू काश्मीर माणसे सोबत असेल तरच तो प्रदेश आपल्याकडे आहे. माणसेच संस्कृती पुढे नेण्याचे काम करतात त्यामुळे ते टिकवणे आवश्यक आहे. काश्मीर मधील संस्कृती पुरातन आहे. विविधता त्याठिकाणी दिसून येते कारण हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शिया असे विविध लोक दिसून येतात. कलम ३७० तरतूद ही त्यावेळी तो भाग सोबत रहावा यासाठी केली होती. पण नंतरच्या काळात त्याचा वेगळा अर्थ घेतला गेला. कायम हा भाग वादाचा राहिलेला असून त्याचा सर्वांगीण विचार करून बदल घडणे महत्वपूर्ण आहे.
कुमार सप्तर्षी म्हणाले, निःस्वार्थ सेवा काहीजण करतात मात्र, आता स्वार्थी काही लोक दिसून येतात. अधिक कदम यांना काश्मीर वेदनाची तार छेडली गेली आणि त्यातून आदर्श काम उभे राहत आहे हे महत्वपूर्ण आहे. धर्म हा माणसाला जीवन जगण्यास मदत करत असतो पण, धर्माच्या नावाने कोणी हिंसा करणे योग्य नाही.
लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, कागदावर आपण देश निर्माण करतो पण प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे बॉर्डरलेस काम करणे महत्त्वपूर्ण आहे. काश्मीर प्रश्न हा जुना असून जटिल आहे. काश्मीर बाबत मी दोन कादंबरी लिखाण सध्या करत आहे. भारतात काश्मीर हा तत्कालीन परिस्थितीमुळे राजा हरिसिंग यांच्या पुढाकाराने आला. काश्मीर मध्ये सध्याच्या काळात शांतता राहणे गरजेचे आहे.

