मुंबई- -मराठीतील पिंजरा सिनेमातील संध्या आणि आधा ही चंद्रमा रात आधी या गाण्यातील संध्या सर्वांना आठवत असेल ,अत्यंत उत्कृष्ट नर्तकी आणि अभिनेत्री म्हणून आपली प्रत्येक भूमिका साकारलेली व्ही शांताराम यांची पत्नी संध्या शांताराम यांचे आज निधन झाले वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
1972 साली प्रदर्शित झालेला व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘पिंजरा’ हा मराठी चित्रपटसृष्टीतील अमर कलाकृती मानली जाते. एका आदर्श शिक्षक आणि तमाशा कलावंत यांच्यातील प्रेम कथेवर आधारित या चित्रपटात संध्या यांनी साकारलेली तमाशातील नर्तिकेची भूमिका प्रचंड गाजली. या भूमिकेमुळे त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री बनल्या. आजही ‘पिंजरा’ आणि संध्या यांची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
संध्या यांचा जन्म.२७ सप्टेंबर १९३२ रोजी चा. त्यांचे संपूर्ण नाव विजया श्रीधर देशमुख. त्यांचे वडील श्रीधर देशमुख हे रंगभूमीवरील कलाकार होते. ते देशी नाटक समाज या गुजराती नाटक कंपनीत काम करत असत. भांगवाडी थिएटरमध्ये त्या कंपनीची नाटके होत असत. विजया म्हणजेच संध्या आणि त्यांची मोठी बहीण वत्सला या दोघी लहानपणापासून त्या कंपनीच्या गुजराती नाटकातून भूमिका करत. नाटकातून अभिनय करता करता संध्या यांनी गुजराती चित्रपटातून काम करण्यास सुरुवात केली.
या सुमारास व्ही शांताराम मौज दिवाळी अंकात आलेल्या ‘श्रीमंताकडचे बोलावणे’ या चि. य. मराठे यांच्या कथेवर चित्रपट काढण्याच्या तयारीत होते. त्यासाठी त्यांनी विजया देशमुख या नव्या नटीची निवड केली, तो चित्रपट होता ‘अमर भूपाळी’. या चित्रपटासाठी विजया यांचे ‘संध्या’ असे नाव ठेवण्यात आले. ‘अमर भूपाळी’ चित्रपटातील त्यांची भूमिका ही तमासगिरिणीची होती व नाव होते गुणवती. या चित्रपटात त्यांना बरीच नृत्ये करावयाची होती व त्यासाठी संध्या यांनी अपार कष्ट घेऊन नृत्याचे धडे गिरवले आणि आपली भूमिका पार पाडली. चित्रपट खूपच चालला आणि नायिका संध्या यांचे नाव झाले. होनाजी बाळांवरचा हा चित्रपट पुढे बंगाली भाषेत पण झाला.
संध्या यांचा पुढचा चित्रपट होता ‘परछाई’. हा फक्त हिंदी भाषेत होता आणि त्यात त्यांच्या वाट्यास खलनायिकेची भूमिका आली होती. चित्रपटात नायक आणि नायिका म्हणून खुद्द व्ही.शांताराम आणि जयश्रीबाई होत्या. या चित्रपटामुळे संध्या हे नाव तमाम हिंदी भाषिक प्रांतातून प्रसिद्ध झाले. त्यांचा पुढचा चित्रपट होता ‘तीन बत्ती चार रास्ता’. हा चित्रपट भाषिक प्रांतवादावर आधारित होता. त्यानंतर व्ही शांताराम यांनी नृत्याला प्राधान्य असणारा रंगीत चित्रपट काढण्याचे ठरवले. हा चित्रपट होता ‘झनक झनक पायल बाजे’. नायिका म्हणून संध्या हे नाव जाहीर झाले. त्या प्रसंगी सुप्रसिद्ध दिग्दर्शक मेहबूब खान शांतारामबापूंना म्हणाले, ‘देखो, आप ये फिल्म कलरमें बना रहे हो, तो बडी नामवाली हिरॉईन – जैसे वैजयंतीमाला, पद्मिनी को लिजिये|’’ पण शांतारामबापू बधले नाहीत आणि संध्या यांनी चित्रपटात काम करून इतिहास घडवला. पुढे ‘दो आँखे बारह हाथ’, ‘नवरंग’ या चित्रपटांनी राजकमल चित्रपट संस्थेला मालामाल करुन टाकले. ‘दो आँखे बारह हाथ’ ने बर्लिनच्या चित्रपट महोत्सवात पारितोषिक पटकविण्याचा मान मिळवला. हॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक सेसील बी. डिमेल यांनी त्यांच्यातर्फे एक पारितोषिक दिले. त्यानंतर संध्याबाईंनी ‘स्त्री’, ‘सेहरा’, ‘लडकी सह्याद्री की’, ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ यांसारखे चित्रपट शांतारामबापूंसाठी केले.
१९७२ सालात त्यांचा मराठी चित्रपट ‘पिंजरा’ पडद्यावर झळकला आणि त्या चित्रपटाने सर्व विक्रम मोडले. ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ आणि वर्ष होते १९७५. ‘अमर भूपाळी’नंतर तब्बल पंधरा वर्षांनी संध्या यांनी ‘इथे मराठीचिया नगरी’ या व्ही. शांताराम दिग्दर्शित चित्रपटात भूमिका केली. संध्या यांनी ‘राजकमल’ खेरीज दुसऱ्या कुठल्याही चित्रपट संस्थेत काम केले नाही. राजकमल आणि व्ही. शांताराम यांच्याशी संध्या यांची निष्ठा होती, हे सर्वज्ञात आहे. महाराष्ट्र शासनाने संध्या यांचा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव केला होता.
ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी त्यांच्या आयुष्यात तीन विवाह केले होते. संध्या या त्यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. दुसरी पत्नी, अभिनेत्री जयश्री यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर अवघ्या एका महिन्यातच शांताराम यांनी संध्या यांच्याशी विवाह केला होता. संध्या यांनी मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले असले, तरी त्यांच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या. अभिनयासोबतच त्या एक कुशल नृत्यांगना म्हणूनही ओळखल्या जात.
संध्या यांनी 1959 मध्ये आलेल्या ‘नवरंग’ सिनेमातून कमाल दाखवली होती. व्ही. शांताराम यांचा हा चित्रपट होता. “अरे जा रे हट नटखट” हे त्यांचे गाणे आजही तुफान लोकप्रिय आहे. संध्या शांताराम, यांचे खरे नाव विजया देशमुख होते. अरे जा रे हट नटखट या गाण्यासाठी त्या विशेषतः शास्त्रीय नृत्य शिकल्या. त्यावेळी कोणतेही नृत्यदिग्दर्शक नव्हते; गाण्यात तुम्हाला दिसणारी स्टेप संध्या स्वतः किंवा दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी सादर केली होती.
दिग्दर्शक व्ही. शांताराम यांना हे गाणे खरोखरच खास बनवायचे होते, म्हणून त्यांनी खऱ्या हत्ती आणि घोड्यांची व्यवस्था केली. सेटवर खऱ्या प्राण्यांमध्ये संध्या निर्भयपणे नाचत होत्या. अभिनेत्री संध्यांना माहित होते की हे सोपे नाही, कारण प्राणी आवाज आणि माणसांमुळे अस्वस्थ होऊ शकतात. पण त्या घाबरल्या नाहीत. त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांनी बॉडी डबलही वापरला नाही. गाण्याच्या शूटिंगपूर्वी, त्यांनी हत्ती आणि घोड्यांशी मैत्री केली, त्यांना स्वतःच्या हातांनी केळी आणि नारळ खायला दिले आणि पाणी पाजले. संध्याच्या समर्पणाने आणि धाडसाने दिग्दर्शक प्रभावित झाले.

