मुंबा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलची दिमाखदार सुरुवात
तरुणांचा प्रचंड प्रतिसाद
पुणे : बुद्धिवादी शिक्षण हे स्वयंकेद्रीत असल्यामुळे जगण्याविषयी संवेदना निर्माण झालेल्या नाहीत. जीवनाच्या सर्वात जवळ जाणारे आणि भावनेचे माध्यम वापरणारे एकच साधन आहे ते म्हणजे चित्रपट. चित्रपटासाठी आधुनिक तंत्रज्ञान हाताळणे सोपे असले तरी त्याचे व्याकरण समजून घेणे आवश्यक आहे. आधुनिक बुद्धिवादी शिक्षण पद्धतीतून फक्त वाचक निर्माण झाले; परंतु उत्तम प्रेक्षक, श्रोते निर्माण होऊ शकले नाहीत. बुद्धिची भाषा शिकविली जाते परंतु संवेदनांची भाषा शिकविली जात नाही, अशी खंत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केली. संवेदनक्षम मनाची क्षमता ओळखू न येता एखाद्याला वाळीत टाकणे ही आधुनिक अस्पृश्यता आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
मुंबा फिल्म फाऊंडेशन आयोजित सहाव्या मुंबा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन बुधवारी (दि. 24) ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे तसेच चित्रपट निर्माते उमेश कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यावेळी डॉ. आगाशे बोलत होते. ‘आता थांबायचे नाय’ या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाने फिल्म फेस्टिव्हलचा शुभारंभ झाला. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, लॉ कॉलेज रोड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महोत्सवाचे आयोजक जय भोसले, महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील मराठी भाषा समन्वयक किरण गायकवाड, एमआयटी कॉलेजच्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म स्कूलचे विभाग प्रमुख डॉ. अरुण प्रकाश, मराठवाडा मित्र मंडळाच्या कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. गणेश पठारे मंचावर होते.
बुद्धिवादी शिक्षण हे स्वयंकेंद्रीत; संवेदनांचा अभाव
आधुनिक शिक्षण पद्धतीवर मार्मिक भाष्य करताना डॉ. मोहन आगाशे म्हणाले, बुद्धी आणि संवेदना असणारे, लेखक आणि कवी झाले, तर बुद्धिवादी नुसते वाचकच राहिले. या शिक्षण पद्धतीमुळे बोलणारा शब्द फक्त लिहिता झाला आणि त्यामुळे दोन पाय आणि दोन डोळ्यांचा मानव एक पाय आणि एका डोळ्यावर आला. चित्रपट हे माध्यम करमणूक आणि शिक्षण या दोन्ही करिता वापरले गेले तर मानव दोन्ही पाय आणि दोन्ही डोळ्यांचा वापर करू लागेल. बुद्धिवादी शिक्षण हे स्वयंकेंद्रीत असल्याने यात संवेदनक्षमता नाही त्यामुळे भावना ओळखणे, हाताळणे घडू शकत नाही. यातूनच युद्धासारखे प्रसंग उद्भवले आहेत.
डॉ. मोहन आगाशे पुढे म्हणाले, चित्रपट करणेच नव्हे तर बघणे देखील शिका आणि त्यातून स्वत:ची परीक्षा करा. चित्रपट निर्मिती करताना माध्यमाची कुवत जाणून घेणे गरजेचे आहे. जिवंत माणसाचा मुदडा करून तो साठविणे याला आठवण म्हणत नाहीत हे चित्रपटाच्या माध्यमातून शिकणे महत्त्वाचे आहे. निव्वळ मनोरंजनात्मक चित्रपटातून योग्य ते शिक्षण मिळत नसल्यामुळे प्रेक्षकांची मानसिक प्रकृती खराब झाली आहे.
मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव संवेदनांचा उत्सव : उमेश कुलकर्णी
उमेश कुलकर्णी म्हणाले, लघुपट हे माध्यम प्रभावी आणि स्वातंत्र्य देणारे आहे. या माध्यमाद्वारे मनातील भावना प्रकट होऊ शकतात. आपल्या मनात नक्की काय घडते आहे हे आजची तरुणाई लघुपटाच्या माध्यमातून मांडत आहे. कलेच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर भाष्य करणे, प्रश्न निर्माण करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात चित्रपट माध्यमांविषयी अपेक्षेएवढे लोकशिक्षण झालेले दिसत नाही. चांगला प्रेक्षक घडविण्याचे कार्य अशा चित्रपट महोत्सवातून वारंवार होणे गरजेचे आहे. फक्त पुणे-मुंबईच नव्हे तर गावागावांमध्ये अशा स्वरूपाचे कार्य व्हावे, ज्या योगे उत्तमोत्तम चित्रपट, लघुपट प्रतिभावान युवा पिढीपर्यंत पोहोचतर,. मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव संवेदनांचा उत्सव आहे. यातून समाजभान निर्माण व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
चित्रपट महोत्सव आनंदयात्रा ठरेल
प्रास्ताविकात वीरेंद्र चित्राव म्हणाले, माध्यम क्रांती झाल्यामुळे चित्रपट महोत्सवाला युवा वर्गाचा वाढता प्रतिसाद लाभत आहे. चित्रपट, लघुपट निर्मितीतून संवेदशीलता आणि जाणीवा जागृत झाल्यास युवा पिढीकडून या क्षेत्रात प्रभावी कार्य घडेल. मुंबा फिल्म फेस्टिव्हलच्या माध्यमातून सकस निर्मिती करणाऱ्या चित्रपट, लघुपटांना मंच उपलब्ध करून दिला जात आहे. निर्माते, दिग्दर्शक, अभ्यासक आणि प्रेक्षकांसाठी हा महोत्सव आनंदयात्रा ठरेल.
लघुपट निर्मितीसाठी एनएफडीसीने आर्थिक सहाय्य द्यावे
चित्रपट निर्मितीसाठी एनएफडीसीने आर्थिक सहाय्य केल्यामुळे अनेक लेखक, दिग्दर्शक, कलावंतांना त्याचा फायदा झाला. लघुपट हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. लघुपट निर्मितीच्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांना एनएफडीसीने अनुदान द्यावे, अशी मागणी फेडरेशन ऑफ सोसायटीज् ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष वीरेंद्र चित्राव यांनी या प्रसंगी केली.
डॉ. गणेश पाठारे, किरण गायकवाड यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. महोत्सवाचे सचिव विश्वास शेंबेकर, विरेंद्र चित्राव, बाळासाहेब रास्ते यांनी स्वागत केले. महोत्सवाचे संचालक अभिषेक अवचार यांनी सूत्रसंचालन केले.
दि. 24 ते 28 सप्टेंबर 2025 या कालावधीत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, पंडित नेहरू नाट्यगृह आणि मराठवाडा मित्र मंडळाचे कॉमर्स कॉलेज या तीन नामांकित ठिकाणी चित्रपटांचे स्क्रीनिंग होणार आहे. महोत्सव सर्वांसाठी खुला आहे. यावर्षीच्या फेस्टिव्हलमध्ये केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएफडीसी) यांचाही सहभाग आहे.

