पुणे, दि. २४ सप्टेंबर: सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता त्यांची कायमस्वरुपी सोय व्हावी याकरिता १५ गावांमध्ये शेत,पाणंद, शिव रस्त्यांना सिमांकन करावयाचे कामकाज युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली आहे.
इंदापूर तालुक्यात थोरातवाडी (रुई), भोडणी, व्याहळी, कपरवाडी (वा), सरडेवाडी, गलांडवाडी नं. २, गोखळी, म्हसोबाचीवाडी, जंक्शन, डाळज नं.१, जाधववाडी, तावशी, अगोती नं.१, वकीलवस्ती आणि करेवाडी १५ गावांमध्ये शेत,पाणंद, शिव रस्त्याचे सिमांकन कार्यवाही सुरु आहे. या गावांमध्ये पहिल्या पाच दिवसामध्ये शिवारफेरी घेण्यात येणार असून मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, मोजणी विभागाचे कर्मचारी व पोलीस पाटील यांच्यामार्फत गाव नकाशावर असलेले आणि नसलेले रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. याबाबत १७ सप्टेंबर रोजी आयोजित विशेष ग्रामसभेत रस्त्यांची प्राथमिक यादी तयार करुन मान्यता घेण्यात आली आहे. त्याप्रमाणे ग्रामसभेत ठरावही घेण्यात आले आहेत.
ग्रामसभेत घेण्यात आलेल्या ठरावानुसार १५६ पाणंद रस्त्याबाबत गावपातळीवरुन प्रस्ताव प्राप्त झाले आहेत, या रस्त्यांचे सिमांकन करण्याकरिता उप अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे पाठविण्यात आहे आहेत. भूमी अभिलेख विभागामार्फत या रस्त्यांची मोजणी व सिमांकनासाठी शुल्क आकारण्यात येणार नाही. येत्या काळात रस्त्यांना विशिष्ट सांकेतांक क्रमांक निश्चित करण्यात येणार आहेत, असे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
वैभव नावडकर, उपविभागीय अधिकारी: शेतकऱ्यांना शेतात ये-जा करणे, शेतीउपयोगी व यांत्रिकी साहित्य शेतात ने-आण करणे तसेच बाजारपेठेमध्ये शेतमाल वेळेत पोहचविण्याकरिता शेतरस्ते महत्वाचे आहे. राज्यात मुळ जमाबंदीवेळी तयार करण्यात आलेल्या नकाशामध्ये तसेच एकत्रीकरण योजनेच्यावेळी तयार करण्यात आलेल्या गट नकाशामध्ये त्यावेळी अस्तित्वात असलेले ग्राम रस्ते, शिवरस्ते व गाडीमार्ग दर्शविण्यात आलेले आहेत. मात्र त्यानंतर नवीन रस्त्याच्या नोंदी न झाल्यामुळे रस्त्यांच्या वापराबाबत तक्रारी, अतिक्रमण यांसारख्या समस्या उद्भवत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनी १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये विभागात सेवा पंधरवडा उपक्रम राबविण्यात येत आहे, या उपक्रमामुळे रस्त्यांच्या अधिकार अभिलेखामधील नोंदी अद्यावत होतील आणि शेतरस्त्यांच्या समस्यांचे निराकारण होईल. या उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. नावडकर यांनी केले आहे.

