अंद्रोथ भारताच्या वाढत्या सागरी आत्मनिर्भरतेचे प्रतीक
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2025
अंद्रोथ ही भारतीय नौदलाची दुसरी अत्याधुनिक पाणबुडीविरोधी उथळ पाण्यातील युद्धनौका 6 ऑक्टोबर 2025 रोजी विशाखापट्टणम येथील नौदल गोदीत (Naval Dockyard) नौदलात सामील होणार आहे. पूर्व नौदल कमांडचे ध्वज अधिकारी कमांडिंग इन चीफ, व्हाईस ॲडमिरल राजेश पेंढारकर यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडेल. या सोहळ्याच्या माध्यमातून भारतीय नौदलात सामील होणार असलेल्या अत्याधुनिक पाणबुडीविरोधी उथळ पाण्यातील 16 युद्धनौकांपैकी हे दुसरे जहाज औपचारिकरित्या नौदलात सामील होणार आहे.
अंद्रोथ या युद्धनौकेची बांधणी कोलकात्याच्या गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडने केली आहे. या जहाजासाठीचे 80% पेक्षा जास्त बांधकाम हे स्वदेशी घटकांसह झाले आहे. यातून केंद्र सरकारच्या आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनाची प्रचिती येते. तसेच हे जहाज भारताच्या वाढत्या सागरी आत्मनिर्भरतेचे प्रतीक ठरले आहे. जहाज उत्पादन संचालनालय आणि कोलकात्याच्या युद्धनौका निरीक्षण पथकाच्या मार्गदर्शनाखाली बांधण्यात आलेली अंद्रोथ ही युद्धनौका 13 सप्टेंबर 2025 रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली होती.
अंद्रोथ हे नाव लक्षद्वीप द्वीपसमूहातील अंद्रोथ बेटावरून दिले गेले आहे. धोरणात्मक आणि प्रतीकात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या नावातून भारताच्या विशाल सागरी सीमांचे रक्षण करण्याच्या वचनबद्धता अधोरेखित होते.
यापूर्वी आयएनएस अंद्रोथ (P69) या नावाने कार्यरत असलेली युद्धनौका 27 वर्षांहून अधिक काळ देशाची सेवा करून नौदलातून निवृत्त झाली होती. नवीन अंद्रोथच्या नौदलातील समावेशामुळे तिच्या आधीच्या युद्धनौकेचा वारसा आणि भावना कायम राखली जाणार आहे.
प्रगत शस्त्रे आणि संवेदक प्रणाली, आधुनिक दळणवळण यंत्रणा आणि वॉटरजेट प्रणोदनाने सुसज्ज असलेली अंद्रोथ ही युद्धनौका, पाण्याखालील धोके अचूकपणे शोधून काढण्याच्या, त्यांचा मागोवा घेण्याच्या आणि त्यांना निष्क्रिय करण्याच्या क्षमतेने सुसज्ज आहे. या युद्धनौकेच्या अत्याधुनिक क्षमतांमुळे सागरी पाळत ठेवणे, शोध आणि बचाव कार्ये आणि किनारपट्टी संरक्षण मोहिमांसारखी विविध प्रकारची कार्ये पार पाडण्यासही ती सक्षम आहे.
अंद्रोथ ही युद्धनौका नौदलात दाखल होणे, हे भारताची सागरी सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. या युद्धनौकेमुळे नौदलाची पाणबुडीविरोधी युद्धक्षमता वाढण्यासोबतच, स्वदेशी प्रयत्नांतून जागतिक दर्जाच्या युद्धनौकांचे डिझाइन, विकास आणि बांधकाम करण्याच्या राष्ट्राच्या संकल्पालाही दुजोरा मिळाला आहे.
R829.jpeg)

