पुणे- कोंढव्यातील दूषित व विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत महापालिका आयुक्तांना मनसेने आज निवेदन देत साकडे घातले. मनसे प्रमुख साईनाथ बाबर यांनी हे निवेदन दिले आहे. बाबर यावेळी म्हणाले ,’ कोंढवा परिसरातील अजमेरा पार्क, ग्रीन पार्क, रॉयल पार्क व अश्रफ नगर या भागातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येला सामोरे जात आहेत. या भागात मिळणारे पाणी हे केवळ कमी दाबानेच येते असे नाही तर त्यात ड्रेनेजचे पाणी मिसळून नागरिकांना आरोग्याच्या भयंकर संकटाला तोंड द्यावे लागत आहे. ही बाब इतकी गंभीर आहे की, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला यांचे जीवन धोक्यात आले आहे.महानगरपालिकेने या समस्येकडे आजवर केलेले दुर्लक्ष हे नागरिकांच्या सहनशीलतेची परीक्षा घेणारे आहे. नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या, निवेदने दिली, तरीसुद्धा प्रशासनाने याकडे काणाडोळाच केला आहे. पुणे महानगरपालिका ज्या जोमाने, ज्या ताकदीने आणि ज्या पद्धतीने मालमत्ता कर, विविध कर आणि दंड वसूल करण्यासाठी उत्साह दाखवते, त्याच जोमाने नागरिकांच्या पाणीपुरवठ्याच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष का देत नाही? नागरिकांकडून कर वसूल करताना प्रशासनास कोणतीही अडचण वाटत नाही, मग त्याच नागरिकांना जगण्यासाठी लागणारे शुद्ध पाणी देताना महापालिका मौन का बाळगते?
हे नागरिकांसोबतचे उघड अन्यायकारक वर्तन आहे. नागरिकांना त्यांच्या पैशाचा, कराचा, अधिकाराचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. पाणी हा माणसाचा प्राथमिक हक्क आहे. पुणे सारख्या शहरात २०२५ मध्ये सुद्धा नागरिकांना दूषित व अपुरा पाणीपुरवठा सहन करावा लागणे हे अत्यंत लाजिरवाणे व प्रशासनाच्या अपयशाचे स्पष्ट निदर्शक आहे.
म्हणूनच आयुक्तांनी तातडीने पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे :
१) वरील परिसरातील संपूर्ण पाणीपुरवठा लाईनची तातडीने तपासणी करून दुरुस्ती करावी.
२) ड्रेनेजचे पाणी मिसळण्याची समस्या कायमस्वरूपी थांबवावी.
३) नागरिकांना नियमित व पुरेशा दाबाने शुद्ध पाणीपुरवठा होईल याची खात्री करून द्यावी.
४) या सर्व कामांसाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करून नागरिकांना माहिती द्यावी.
साईनाथ बाबर यांनी पुढे असेही म्हटले आहे कि,’याकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहराच्या वतीने आम्ही नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन उभारू. त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची पूर्ण जबाबदारी पुणे महानगरपालिकेवर राहील.नागरिकांचा संयम आता संपत आला आहे. पुणे महापालिकेने जर नागरिकांकडून कर वसूल करताना दाखवलेली तत्परता, प्रामाणिकपणे या समस्यांवर दाखवली नाही, तर रस्त्यावर उतरून उत्तर मागितले जाईल.

