मुंबई-सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उद्यापासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कुकर्मांची मालिका सुरू करण्याचा इशारा दिला आहे. अंजली दमानिया गत काही दिवसांपासून सातत्याने गडकरींच्या मुलाच्या कंपनीच्या नफेखोरीवरून त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. त्यातच आता त्यांनी थेट गडकरींच्या कुकर्माची मालिका जाहीर करण्याचा इशारा दिल्यामुळे राज्याच्या राज्यासह देशाच्या राजकारणात मोठी खळबळ माजण्याची चिन्हे आहेत.
अंजली दमानिया यांनी मंगळवारी सकाळी एका ट्विटद्वारे नितीन गडकरी यांचा मुलगा दिवसाकाठी तब्बल 144 कोटी रुपयांनी श्रीमंत होत असल्याचा दावा केला होता. त्यांच्या ट्विटची राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली होती. तत्पू्र्वी परवा त्यांनी आपण एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत असल्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार, त्यांनी उद्यापासून आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पोलखोल मालिका सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. उद्या दुपारपासून मी नितीन गडकरी यांच्या विरुद्ध पोल खोल करायला सुरवात करणार आहे. त्यांच्या सगळ्या कुकर्मांची पूर्ण मालिकाच सुरू करणार आहे, असे त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्यात.नितीन गडकरींनी काही दिवसांपूर्वीच माझ्या बुद्धीचे मूल्य प्रत्येक महिन्याला 200 कोटी रुपये इतके आहे, असे विधान केले होते. अंजली दमानिया यांनी त्यांच्या या विधानाचा दाखला देत आज म्हणाल्या होत्या की, गडकरी म्हणतात की, त्यांना पैशांची गरज नाही. त्यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत. त्यांच्या मेंदूचे मूल्य दर महिन्याला 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. खरेतर त्यांनी स्वतःला खूप कमी लेखले आहे. कारण, गडकरींचे सुपुत्र दररोज 144 कोटी रुपयांनी श्रीमंत होत आहेत.
आपल्याला माहिती आहे की, गडकरींच्या मुलाची सियान अॅग्रो नामक कंपनी आहे. 25 जून रोजी सियान अॅग्रोमध्ये 1,89,38,121 प्रमोटर होल्डिंग शेअर्स होते. या शेअरच्या किंमतीत आज 76 रुपयांची वाढ झाली. म्हणजेच एका दिवसात 143.92 कोटी रुपये त्यांनी कमावले. निखील व सारंग गडकरी दिवसाला इतके पैसे कमावत आहेत, असे दमानिया म्हणाल्या.

