पुणे, दि. २३: खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्रात नेमबाजी (शुटींग) या क्रीडा प्रकारामध्ये प्रवेश देण्यासाठी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी पुणे येथे गुरुवार २५ सप्टेंबर २०२५ रोजी निवड चाचणी घेण्यात येणार असून इच्छुक खेळाडूंनी सकाळी ९ वाजेपर्यंत उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा उपसंचालक युवराज नाईक यांनी केले आहे.
खेळाडूंची तज्ज्ञ समितीमार्फत निवड चाचणी घेण्यात येणार असून गुणानुक्रमे प्रवेश निश्चित करण्यात येणार आहे. निवड प्रक्रियेसाठी शुटींग खेळाचे राज्य स्तरावर प्राविण्य प्राप्त किंवा राष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतलेले खेळाडूच पात्र असतील. दर्जात्मक खेळाडूंच्या निवड चाचणीसाठी मानके तयार करण्यात आली आहेत. पात्र खेळाडूंनी kiscepune@gmail.com या ईमेल पत्त्यावर २४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज पाठवावेत.
निवड चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी निवास व भोजनाची व्यवस्था स्वत: करावयाची आहे. चाचणीस येताना राज्य, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्रे, आधार कार्ड, जन्म दाखला व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित व मूळ प्रती सोबत आणावी. खेळाडूंचा प्रवेश निश्चित झाल्यावर निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात येईल. खेळाडू १ जानेवारी २००५ नंतर जन्मलेला असावा. चाचणीस येताना खेळाडूंनी जन्मतारखेची नोंद असलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टरची छायांकित प्रत सोबत आणावी, असेही श्री. नाईक यांनी कळविले आहे.

