मनमानी कारभाराविरोधात महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या विरोधात आंदोलन
राज्य क्रीडा संघटनांना मतदानाचा अधिकार मिळावा, भ्रष्टाचाराची चौकशी यासाठी संदीप भोंडवे यांचे उपोषण
पुणे: महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेमध्ये महासचिव नामदेव शिरगावकर यांच्या मनमानी, भ्रष्टाचारी कारभाराबाबत अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे अनेकदा तक्रार करूनही त्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. अजित पवार यांना संघटनेच्या कामात लक्ष देण्यासाठी वेळ नसेल, तर त्यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस यांनी केली. संघटनेच्या भ्रष्ट व भोंगळ कारभारामुळे खेळाडूंचे नुकसान होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाकारल्यानंतर राज्यभरातील २५ ते ३० क्रीडा संघटना व खेळाडू आक्रमक झाले असून, मंगळवारी रामदास तडस यांच्या नेतृत्वाखाली बंडगार्डन पोलीस स्टेशनसमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. कुस्ती, कबड्डी, तायक्वांदो, बॉक्सिंग, हँडबॉल, स्विमिंग, कुराश अशा विविध २५ ते ३० संघटनांचे पदाधिकारी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, पुरस्कारप्राप्त खेळाडू या निषेध आंदोलनात सहभागी झाले. नामदेव शिरगावकर यांनी तीन नॅशनल गेम्समध्ये केलेला भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी व महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या निवडणुकीत सर्व संलग्न ५० राज्य क्रीडा संघटनांना मतदानाचा अधिकार मिळावा, यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष व भाजप क्रीडा आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पै. संदीप भोंडवे आमरण उपोषणाला बसले आहेत. यावेळी हिंदकेसरी पै. योगेश दोडके, कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष विलास कथुरे, हँडबॉल संघटनेचे सरचिटणीस राजाराम राऊत, सायकलिंग असोसिएशनचे संजय साठे, तायक्वांदो खेळाडू मिलिंद पाठारे, प्रवीण बोरसे, सुभाष पाटील, सल्लाउद्दीन अन्सारी, संदीप गाडे, तात्या भिंताडे आदी उपस्थित होते.
रामदास तडस म्हणाले, “संघटनेला ५० खेळांच्या संघटनांना मान्यता असतानाही केवळ २२ संघटना मतदानासाठी पात्र ठरवणे, हे लोकशाहीला काळिमा फासणारे आहे. नामदेव शिरगावकर यांची ही मुजोरी आणि भ्रष्ट कारभार खेळाडूंच्या आयुष्याशी खेळ आहे. खेळाडूंच्या कल्याणासाठी आमचे हे आंदोलन आहे. ‘नामदेव हटाव’ ही एकच सर्वांची मागणी आहे. त्यासाठी संदीप भोंडवे उपोषणाला बसले आहेत. यासह आम्ही या दोन्ही गोष्टींवर हरकती नोंदवल्या असून, २५ तारखेपर्यंत याचा निकाल लागला नाही, तर २७ तारखेपासून माझ्यासह अन्य खेळाडू व पदाधिकारी महाराष्ट्रभर आमरण उपोषणाला बसतील.”
“गुजरात, गोवा, उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी राज्य शासनाने १२ कोटी रुपये दिले. मात्र, त्याचा हिशोब अद्यापही दिलेला नाही. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. महाराष्ट्रातील खेळाडूंना मागे खेचण्याचे काम संघटनेकडून सुरु आहे. अजित पवार केवळ नावापुरते पदावर आहेत की काय, अशी शंका आम्हाला येत आहे. माझ्यासह केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्याची दखल घेतली जात नाही. पवार यांना संघटनेच्या कार्यात लक्ष घालायला वेळ नसेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आहे.”
उपोषणाला बसल्यानंतर संदीप भोंडवे म्हणाले, “खेळासाठी वेळ देऊ शकणारे, खेळाडूंचा विचार करणारे लोक संघटनेत येण्यासाठी सर्व संघटनांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. नामदेव शिरगावकर यांच्यासारखे भ्रष्ट लोक संघटनेतून बाहेर काढण्यासाठी हा आमचा लढा आहे. भ्रष्टाचाराची चौकशी, सर्वाना मतदानाचा अधिकार आणि नामदेव शिरगावकर यांना हटवत नाही, तोवर माझे उपोषण सुरु राहणार आहे. खेळाडूंच्या नावावर स्वतःच्या व कुटुंबियांच्या नावाने कंपन्या काढून शिरगावकर यांनी मोठ्या प्रमाणात पैसे लाटले आहेत.”
यावेळी आंदोलनात सहभागी खेळाडूंचे रौद्र रूप पाहायला मिळाले. संघटनेच्या भोंगळ कारभारामुळे खेळांमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवूनही आम्हाला योग्य संधी मिळत नसल्याची खदखद खेळाडूंनी व्यक्त केली. कुस्ती, तायक्वांदो खेळांची प्रात्यक्षिके करून हलगीच्या निनादात झालेल्या या आंदोलनाने सर्वांचेच लक्ष वेधले.

