दीप्ती भोगले आणि अर्चना देशमाने यांना
‘तेजस्विनी पुरस्कार’ प्रदान
पुणे – पुणे नवरात्र महिला महोत्सवात सर्व शास्त्रीय कलांचा सन्मान केला जातो आणि या कलेच्या उपासकांना सातत्याने व्यासपीठ दिले जाते. याचे श्रेय महोत्सवाचे प्रवर्तन, आयोजक जयश्री बागुल आणि आबा बागुल यांचे आहे, असे उद्गार ज्येष्ठ नृत्यांगना, गुरू, संरचनाकार विदुषी शमा भाटे यांनी मंगळवारी येथे काढले.
पुणे नवरात्रौ महोत्सवात दरवर्षी संपन्न होणारा आणि हजारो महिलांचा सहभाग असणारा ‘पुणे नवरात्रौ महिला महोत्सव’ यंदा वैभवशाली २७वे वर्ष साजरे करीत आहे. या महिला महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी शमा भाटे बोलत होत्या. त्यांच्याच हस्ते यावेळी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री गायिका दीप्ती भोगले आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनाथ मुला-मुलींचे शिक्षण व संगोपन करणाऱ्या आळंदी येथील ‘स्नेहवन’ संस्थेच्या अर्चना देशमाने यांना तेजस्विनी पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५ हजार रुपये, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच याप्रसंगी पुणे महानगरपालिकेच्या २५०हून अधिक महिला सफाई कामगारांचा गौरवचिन्ह व भेटवस्तू देऊन विशेष गौरव करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगण, मुक्तांगण शाळेजवळ, शिवदर्शन, पुणे येथे हा कार्यक्रम महिलांच्या प्रचंड प्रतिसादात संपन्न झाला. याप्रसंगी पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, प्रवर्तक आबा बागुल, तसेच निर्मला जगताप, छाया कातुरे, प्रांजली गांधी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
विदुषी शमा भाटे पुढे म्हणाल्या, ‘पुणे नवरात्र महिला महोत्सवाशी मी गेल्या अनेक वर्षांपासून जोडलेली आहे. या व्यासपीठावरून दरवर्षी नृत्याच्या माध्यमातून देवीच्या विविध रूपांचा शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आलो आहोत. जयश्रीताई आणि आबा बागुल यांना नाही म्हणता येत नाही, इतक्या आत्मीयतेने ते हे कार्य करतात. या महोत्सवात सर्व कलांना सन्मानाचे स्थान असते. मान्यवर कलाकारांचा सहभाग असतो. एक कलाकार म्हणून मला हे फार महत्त्वाचे वाटते’.
मनोगत व्यक्त करताना दीप्ती भोगले म्हणाल्या, ‘मी एक भाग्यवान कलाकार आहे. नवरात्र महोत्सवात मी सातत्याने येत आहे. बागुल कुटुंब हे घरची माणसे असावीत, इतके जवळचे आहे कारण कोणत्याही अडचणीत ते धावून येतात. या महोत्सवाच्या माध्यमातून आबा आणि जयश्रीताई, विविध कलांना एका व्यासपीठावर आणून रसिकांना आनंद देतात’.
अर्चना देशमाने म्हणाल्या, ‘स्नेहवनच्या कार्याविषयी शब्दांतून सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष भेट देऊन कार्य पाहणे अधिक आनंदाचे आहे’.
जयश्री बागुल यांनी प्रास्ताविक करताना नवरात्र महिला महोत्सवाची माहिती दिली. शक्तीचे जागरण आणि शक्तीला अभिवादन, ही भावना असून, या निमित्ताने समाजातील विविध महिलांना एकत्र आणणे, संवाद साधणे आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा हेतू असतो, असे त्या म्हणाल्या.
स्वच्छता कर्मचार्यांच्या वतीने आशा भोसले यांनी प्रातिनिधिक मनोगत मांडले. ‘आबा आणि जयश्रीताईंनी आमची आठवण ठेवली आणि सत्कार केला, याचा फार आनंद झाला’, असे त्या म्हणाल्या. सुरवातीला नृत्याविष्काराच्या माध्यमातून देवीवंदना सादर करण्यात आली. तसेच मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. नम्रता जगताप यांनी आभार मानले तर गौरी स्वकुळ यांनी सूत्रसंचालन केले.

