पुणे : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे व पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा (१७ वर्षांखालील मुले व मुली) दिनांक २२ व २३ सप्टेंबर २०२५ रोजी भवानी पेठ येथील जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियमवर सुरू झाली.
या स्पर्धेचे उद्घाटन पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी गृहराज्यमंत्री श्री. रमेशदादा बागवे यांच्या शुभहस्ते, तर अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार गौतम चाबुकस्वार होते.
यावेळी पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक अविनाश बागवे, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष भरतकुमार व्हावळ, पिंपरी-चिंचवड बॉक्सिंग संघटनेचे सचिव मनोज यादव, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष अशोक मेमजादे व जीवनलाल निंदाने, तसेच स्पर्धेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ओंकार कौले आदी मान्यवर उपस्थित होते.
या विभागीय स्पर्धेत पुणे जिल्हा, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, अहिल्यानगर जिल्हा, अहिल्यानगर शहर, सोलापूर जिल्हा व सोलापूर शहर या सात संघांतील १८८ खेळाडू (९० मुले व ९८ मुली) सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत विजेते ठरणारे खेळाडू अलिबाग (रायगड) येथे २५ ते २८ सप्टेंबर २०२५ दरम्यान होणाऱ्या राज्य शालेय बॉक्सिंग स्पर्धेत पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत, अशी माहिती पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष भरतकुमार व्हावळ यांनी प्रास्ताविकात दिली.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव विजय गुजर यांनी केले. पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे महासचिव अभिमान सुर्यवंशी यांनी आभार मानले. पिंपरी-चिंचवडचे राष्ट्रीय पंच ऋषिकांत वचकल यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.

