डॉ. पराग काळकर यांचे मत ; श्री शिवाजी कुल तर्फे ‘आपलं घर’ संस्थेला बाल कार्य सन्मान पुरस्कार प्रदान
पुणे : आज इंटरनेट आणि बदलत्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपली कुटुंब व्यवस्था जाणीवपूर्वक मोडकळीस आणली जात आहे. समाजामध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना सामावून घेण्याची क्षमता असून समाज म्हणून आपण कुठेतरी कमी पडतो आहे का? याचा विचार करायला हवा. आपण नेहमी म्हणतो माणसाने माणसाशी माणसासम वागणे. परंतु आपल्या व्यवहारांमध्ये अशी गोष्ट दिसत नाही, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी व्यक्त केले.
सदाशिव पेठेतील श्री शिवाजी कुल, पुणे या स्काऊट गाईड खुल्या पथकाचे यंदा १०८ वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने श्री शिवाजी कुल व माजी कुलवीर संघातर्फे महात्मा फुले पेठेतील टिंबर मार्केटजवळील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन येथे कुलरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये यंदाचा बाल कार्य सन्मान ‘आपलं घर’ या संस्थेला प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळी नियामक मंडळ सदस्य व ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, ज्येष्ठ कुलवीर माधव धायगुडे, माजी कुलवीर संघाच्या अध्यक्षा अर्पणा जोगळेकर, कुलाचे कुलमुख्य यश गुजराथी, कार्यकारी कुलमुख्य श्लोक मराठे, सहाय्यक कुलमुख्य साक्षी वाडकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
‘आपलं घर’ या संस्थेचे संस्थापक विजय फळणीकर व साधना फळणीकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सन्मानचिन्ह, भेटवस्तू, स्मरणिका असे पुरस्काराचे स्वरूप होते. कुलाचे माजी कुलवीर नरेंद्र धायगुडे यांनी शंखवादनात केलेल्या विश्वविक्रमाच्या कामगिरीबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
डॉ.पराग काळकर म्हणाले, शाश्वत मूल्य असल्याशिवाय एखादी संस्था शंभरी गाठत नाही. संस्था क्षणिक मूल्यावर आधारित असेल तर फार काळ टिकत नाही. चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्यासाठी १०८ वर्षे सुरू असलेले श्री शिवाजी कुलाचे काम महत्त्वाचे आहे. मुले संध्याकाळच्या वेळी मैदानावर खेळायला जात होती, परंतु टोलेजंग इमारतींनी मैदानांची जागा घेतली आणि मैदानावर जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
पराग ठाकूर म्हणाले, श्री शिवाजी कुलाची चळवळ १०८ वर्षे सुरू आहे. आजकाल संस्था एक-दोन वर्ष झाली की पुरस्कर द्यायला सुरुवात करतात. आणि त्याविषयी अनेकांच्या मनात तिरस्कार निर्माण होतो. कारण पुरस्कार उदंड झाले आहेत. श्री शिवाजी कुलाने शंभर वर्षानंतर पुरस्कार द्यायला सुरुवात केली आहे, याचे विशेष कौतुक करायला हवे.
विजय फळणीकर म्हणाले, श्री शिवाजी कुल ही संस्था पुण्यात अतिशय जोमाने आणि तळमळीने काम करत आहे. काम कसे करावे ही शिकवण पुरस्काराच्या माध्यमातून श्री शिवाजी कुलाकडून घेतली आहे, असेही त्यांनी सांगितले. संस्थेतर्फे आयोजित बाल कार्य सन्मान सोहळ्यासोबत कुलरंग महोत्सवांतर्गत कुलवीरांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम देखील झाले.पुणे शहर भारत स्काऊट आणि गाईड स्थानिक संस्थेचे कार्यक्रमाला विशेष सहकार्य मिळाले. कार्यक्रमाला श्री शिवाजी कुलाचे आजी-माजी कुलवीर, मुले-मुली व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

