पुणे, दि. २२ सप्टेंबर २०२५ :
नवरात्रीच्या पावन पर्वावर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी देवीचे दर्शन घेतले. यावेळी देवीस महावस्त्र, तुपाचा प्रसाद, पुरणपोळ्या तसेच श्रीफळ अर्पण करून समाजातील प्रगतीशील कामकाजाबद्दल देवीचे आभार मानले.
या प्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “आज संपूर्ण भारतात व जगभर आदिमायेचा उत्सव सुरू असून महिलांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तंत्रज्ञानाचा वापर, क्रीडा क्षेत्रातील विक्रम, उच्च शिक्षणातील प्रगती तसेच पोलीस दलातील कार्यक्षमता यामुळे महिलांची कर्तृत्वकथा उज्ज्वल होत आहे. कालच स्मृती मानधनाने विराट कोहलीचा विश्वविक्रम मोडून महिलांची ताकद दाखवून दिली आहे.”
तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधत त्यांनी सांगितले की, “अवकाळी पावसामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे महसूल विभागाने तातडीने सुरू करावेत. शेतकरी आणि महिलांच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना अधिकाधिक शक्ती मिळो, अशी प्रार्थना देवीकडे केली.”
आगामी काळात सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव व नाशिक जिल्ह्यांचा दौरा करून पंचायत राज संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.
या दर्शनप्रसंगी त्यांच्या भगिनी जेहलम जोशी, शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी, नितीन पवार कोथरूड विभाग शहरप्रमुख, युवराज शिंगाडे शिवाजीनगर विधानसभा प्रमुख, राजू विटकर झोपडपट्टी पुनर्वसन प्रमुख, वैजयंती विजापुरे महिला आघाडी विभाग प्रमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

