रस्त्याच्या कामाबाबत श्वेतपत्रिका काढण्याची ‘आपले पुणे, आपला परिसर’ची पथविभागप्रमुख पावसकरांकडे मागणी
पुणे : पुणे शहरात रस्त्यांवर खड्ड्यांमुळे पुणेकर त्रासले आहेत. दररोज मोठ्या खड्ड्यांमधून जीव घेणा प्रवास वाहन चालकांना करावा लागत आहे. अवघ्या अर्धा इंचाच्या खड्ड्यामुळे वाहन चालकाला जीव गमवावा लागला आहे. परंतु त्यानंतरही पुणे महापालिकेला जाग येत नसल्याचे चित्र आहे. सातत्याने रस्त्याची कामे काढली जावून पुणेकरांचे कररुपी पैसे खर्च केले जात आहे. त्यामुळे पुणे शहरातील रस्ते कामांबाबत गेल्या काही वर्षांपासून एक गंभीर प्रश्न नागरिकांसमोर आहे. नागरिकांच्या करातून कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही रस्ते प्रश्न सुटण्याऐवजी तिच तिच कामे नावे बदलून पुन्हा केली जात आहेत, असल्याचा आरोप ‘आपला परिसर’ संस्थेने केला आहे.
शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची महती राष्ट्रपती कार्यालयापर्यंत पोहचली आहे. राष्ट्रपती कार्यालयाकडून नाराजी व्यक्त केल्यानंतर महापालिकेने खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. त्यानंतर रस्त्यांवर करण्यात आलेल्या पॅच वर्कमुळे वाहन चालकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पॅच वर्क काढून सरसकट रस्ते तयार करण्यासाठी अधिक आर्थिक तरतूद करण्याचे आदेश दिले होत. त्यानंतर महापालिकेने आर्थिक तरतूद करुन आदर्श रस्त्यासह खड्डे मुक्त रस्ते तयार करण्याचे काम हाती घेतले होते. परंतु आदर्श असलेले खड्डे मुक्त रस्ते आहेत तरी कुठे असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.
सार्वजनिक पैशांचा अपव्यय थांबवण्यासाठी व पारदर्शक कारभार महापालिकेच्या पथ विभागाने करावा, तसेच प्रशासकराज असताना पथ विभागाने जी कुठली काम केली त्या सर्व कामांची एक “श्वेतपत्रिका” तयार करावी अशी मागणी आपले पुणे आणि आपला परिसरचे आणि माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी केली आहे. यासोबतच या “स्पर्धेच्या” मार्गावर “दुचाकी” वरून फिरून काय वस्तुस्थिती आहे हे पाहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
संस्थेने उपस्थित केलेले मुद्दे…..
१. वारंवार दुरुस्ती व प्रकल्पांची नावे बदलणे : २०२२-२३ मध्ये २५० कोटींच्या पॅकेज कामांतून रस्ते दुरुस्ती झाली. २०२३-२४ मध्ये जी-२० परिषद निमित्ताने शहरातील प्रमुख रस्ते दुरुस्त करण्यात आले. २०२४-२५ व २०२५-२६ मध्ये ‘आदर्श रस्ते प्रकल्प’ या नावाखाली दोन वर्षांपासून प्रमुख १५ रस्त्यावर रोड फर्निचर व इतर कामे केली जात आहेत. याशिवाय दरवर्षी मोबाईल व्हॅनद्वारे रिस्टेटमेंट व रोड मेंटेनन्ससाठी सुमारे ४० कोटी रुपयांचा खर्च केला जातो. प्रश्न असा की, नावे बदलून तीच तीच कामे का केली जात आहेत? नागरिकांच्या पैशांचा अपव्यय थांबवणे आवश्यक आहे.
२. डांबर प्लांटचा उपयोग : महापालिकेचा स्वतःचा डांबर प्लांट वर्षभर चालू आहे, अगदी पावसाळ्यात सुद्धा केला जातो. रोज सुमारे ४५० टन माल तयार होतो. हा माल १५ वॉर्ड ऑफिसमध्ये किती प्रमाणात दिला जातो व कोणत्या रस्त्यांवर वापरला जातो, याची माहिती आजपर्यंत पारदर्शकपणे देण्यात आलेली नाही.
३. पालिकेची यंत्रणा व कर्मचारी : महापालिकेच्या पथ कोठ्यांमध्ये आधीपासूनच कायम सेवक, बिगारी, शेवाळेवाले, रोलर, डंपर, पेव्हर उपलब्ध आहेत. मग अशी पूर्ण यंत्रणा असूनही पुन्हा पुन्हा बाहेरून ठेकेदारांना कामे देण्यासाठी नवीन टेंडर काढायची गरज का भासते? हे नागरिकांसाठी मोठे कोडे आहे.
संस्थेच्या मागण्या….
१) २०२२ पासून आजवर झालेल्या रस्ते दुरुस्ती, रिस्टेटमेंट व आदर्श रस्ते प्रकल्पांतर्गत झालेल्या सर्व कामांची वर्षनिहाय व रस्त्यानिहाय सविस्तर माहिती प्रसिद्ध करावी.
२) डांबर प्लांटमधून रोज किती उत्पादन होते, ते किती व कुठे वापरले जाते, याची पारदर्शक नोंद व तपशील जाहीर करावा.
३) पथ कोठ्यांतील कर्मचारी व यंत्रणा प्रत्यक्षात किती काम करत आहेत, याचा ऑडिट अहवाल सादर करावा.
४) पुन्हा पुन्हा टेंडर काढून निधी खर्च करण्यामागे ठेकेदारधार्जिणी हेतू आहे का? याची चौकशी करून सत्य नागरिकांसमोर आणावे.
५) कुठल्या सल्लागाराने १४५ कोटी रुपयांचे इस्टिमेट तयार केले त्या सल्लागाराचे असे नाव.
६) ज्या अधिकाऱ्यांनी तयार केलेले इस्टिमेट तपासले त्या अधिकाऱ्याचे नाव.
७) सल्लागाराने सुचवलेले काम प्रत्यक्ष जागेवर काय परिस्थिती आहे हे बघितले असेल तर त्या अधिकाऱ्याचे नाव.
८) जी २०, अडीचशे कोटी रुपयाचे टेंडर यात या स्पर्धेच्या रस्त्याची किती कामे झाली आहेत हे तपासले आहे का.
९)प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी ठेवलेला निधी प्रत्यक्षात टेंडर मुख्य खाते काढते, त्या त्यात गेल्या तीन वर्षात केलेली कामे कोणती आहे त्याची यादी.
१०) पुणे ग्रँड सायकल स्पर्धा ही अतिशय महत्त्वाची पुणे शहराचं नाव मोठं करणारी स्पर्धा आहे यात दुमत नाही. परंतु या स्पर्धेच्या नावावर सार्वजनिक निधीचा अपव्यय होणार नाही याची खाते प्रमुख म्हणून खात्री करणे आवश्यक आहे.
पुणे ग्रॅंड सायकल टूर हा उपक्रम सुमारे ६८९ किलोमीटर अंतरावर पुणे जिल्ह्यात पार पडणार आहे. यात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि नऊ तालुक्यांचा समावेश आहे. नेमका मार्ग अद्याप निश्चित झालेला नसला तरी हा उपक्रम शहरी, ग्रामीण तसेच डोंगराळ अशा विविध भूप्रदेशांमधून जाणार आहे.
या कार्यक्रमातील काही महत्त्वाचे तपशील:
अंतर : ६८९ किलोमीटर, चार स्पर्धात्मक टप्प्यांमध्ये विभागलेले
भूप्रदेश : शहरी, ग्रामीण आणि डोंगराळ भाग
ठिकाणे : पुणे शहर, पिंपरी-चिंचवड तसेच नऊ तालुके — यामध्ये बारामती, मुळशी, मावळ, भोर आणि वेल्हे यांचा समावेश
अद्याप रूट फायनल नाही मग तरीही पुणे महापालिकेकडून या सायकलिंग मार्गावरील शहरातील रस्त्यांचे नूतनीकरण व दुरुस्ती करण्यासाठी ₹१४५.७५ कोटींच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. हा काय प्रकार आहे ? हा प्रकल्प नोव्हेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

