प्रथम दगडूशेठ गणपतीची मूर्ती असणाऱ्या अकरा मारुती चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचा पुढाकार
पुणे : गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते केवळ उत्सव साजरा करण्यासाठी वर्गणी गोळा करत नाहीत तर किडनी प्रत्यारोपण सारख्या शस्त्रक्रियेसाठी देखील कार्यकर्ते एकत्र येऊन मदत
गोळा करतात आणि उत्सवाच्या आनंदासोबतच समाजसेवा देखील तितक्याच तत्परतेने करतात. असाच एक आदर्श शुक्रवार पेठेतील अकरा मारुती चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी निर्माण केला आहे. मयूर येनपुरे या रुग्णाच्या किडनी प्रत्यारोपणासाठी मंडळाचे कार्यकर्ते आणि गणेश भक्त मित्र परिवाराने ५१ हजार रुपयांची मदत जमा केली आहे.
प्रथम दगडूशेठ गणपतीची मूर्ती असणाऱ्या अकरा मारुती चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना केलेल्या आवाहनानंतर ही रक्कम जमा करण्यात आली. मयूर येनपुरे याला किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेची गरज असून त्याच्या आईनेच आपली किडनी देण्याचा संकल्प केला असून सर्व टेस्ट्स पॉझिटिव्ह आल्यानंतर लवकरच भारती हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया होणार आहे. यासाठी ६ लाख रुपयांची गरज होती. या पार्श्वभूमीवर मंडळाचे कार्यकर्ते व गणेश भक्त मित्र परिवार यांनी एकत्रितपणे ५१ हजार रोख मदत या कुटुंबाकडे सुपूर्द केली. या कार्यक्रमाला अॅड. प्रताप परदेशी, किरण सोनीवाल, सुधीर ढमाले, डॉ. विजय पोटफोडे, राजाभाऊ कदम, दिलीप पवार, दिलीप काळोखे, मंडळाचे अध्यक्ष रवी मोरे, कार्याध्यक्ष विनायक घाटे आदी मान्यवर तसेच मंडळाचे कार्यकर्ते निखिल घुमे, प्रथमेश घाटे, संकेत जाधव, अभिषेक थिटे, सागर गोरड, चंदू वर्डेकर उपस्थित होते.
विनायक घाटे म्हणाले, गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते हे फक्त उत्सव साजरा करण्यापुरते मर्यादित नसून वर्षभर विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय राहून गरजूंना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतात.

