नागपूर-राज्यात मराठा, ओबीसी आणि बंजारा आरक्षणावरून वाद सुरू असताना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आरक्षणाबाबत मोठे विधान केले आहे. ब्राह्मण समाजाला आरक्षण दिले नाही, हे मी परमेश्वराचे सर्वात मोठे उपकार मानतो, असे ते म्हणाले. माणूस हा जातीमुळे नव्हे, तर त्याच्या कर्तृत्वामुळे मोठा होतो, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. ते नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलत होते.मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, मी ब्राह्मण आहे, पण मला जात-पात मान्य नाही. माणूस जात, धर्म किंवा लिंगावरून नव्हे, तर त्याच्या गुणांवरून आणि कर्तृत्वावरून मोठा होतो. त्यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील ब्राह्मण समुदायाचा उल्लेख करत सांगितले की, तिथे दुबे, त्रिपाठी, मिश्रा आदी ब्राह्मण प्रभावी आहेत, तर महाराष्ट्रात त्यांना फारसे महत्त्व मिळालेले नाही.
नितीन गडकरी यांनी यावेळी हलबा समाजासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. हा समाज हातमाग आणि पॉवरलूम च्या साड्यांसाठी प्रसिद्ध होता. ही ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी धापेवाडा येथे ‘धापेवाडा टेक्सटाईल’ नावाचा कारखाना सुरू करण्यात येत आहे. येथे तयार होणाऱ्या साड्यांवर झारखंडमध्ये प्रिंटिंग केले जात असून, त्यांची मागणी वाढली आहे. येत्या सहा महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसेच, या प्रकल्पाच्या उद््घाटनासाठी प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांना बोलावण्यात आले असून, त्यांनी धापेवाडा येथे तयार झालेली साडी परिधान करून येण्याची विनंती मान्य केल्याचेही गडकरी यांनी सांगितले. हेमा मालिनी या साड्या परिधान करून आल्यास या साड्यांचे मार्केटिंग आपोआप होईल. बाजारात दोन ते तीन हजार रुपयांना मिळणाऱ्या या साड्या गरीब व मध्यमवर्गीय महिलांना केवळ 400 रुपयांना उपलब्ध करून दिल्या जातील. यामुळे विदर्भाला सुती हातमाग आणि पॉवरलूम साड्यांची ओळख परत मिळेल.
काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी सरकारी निर्णय प्रक्रियेतील राजकारण्यांच्या हस्तक्षेपावर भाष्य केले होते. राजकारणी सरकारी अधिकाऱ्यांवर ‘जवळच्या कंत्राटदारांना काम द्या’ असा दबाव टाकतात, असे ते म्हणाले होते. यावर मात करून चांगल्या दर्जाचे काम करायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले होते.

