▪️ शिक्षणमंत्र्यांची दिवसभर सर्व तज्ञांच्या सत्रांना उपस्थिती
पुणे, दि. 20
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आयोजित राज्यस्तरीय शालेय शिक्षण परिषदेच्या दुपारच्या सत्रात विविध तज्ज्ञांनी नवीन शिक्षण धोरण २०२०, परख सर्वेक्षण अहवाल, प्रशासकीय सुधारणा, समग्र शिक्षण व विविध शैक्षणिक उपक्रमांबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यात राबविलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगांची माहिती दिली.
दुपारच्या पहिल्या सत्रात मा. आनंद पाटील, अतिरिक्त सचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, केंद्रीय शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांनी ऑनलाईन व्याख्यान दिले. त्यांनी नवीन शिक्षण धोरण २०२० ची अंमलबजावणी, देशभरातील नाविन्यपूर्ण उपक्रम व महाराष्ट्राकडून असणाऱ्या अपेक्षा तसेच प्रधानमंत्री पोषण योजनेविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर श्रीमती इंद्राणी भादुरी, सीईओ अँड हेड ऑफ परख सेल, NCERT, दिल्ली यांनी परख सर्वेक्षण अहवाल, त्यातील महाराष्ट्राची स्थिती व शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रयत्न याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
यानंतर विविध जिल्ह्यांतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सादरीकरणे केली. त्यात कोल्हापूरचे श्री. कार्तिकेयन एस., साताऱ्याच्या श्रीमती याशनी नागराजन, छत्रपती संभाजीनगरचे श्री. अंकित, अहिल्यानगरचे श्री. आनंद भंडारी आणि पुण्याचे श्री. गजानन पाटील यांचा समावेश होता. या सादरीकरणांमध्ये नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी व परिणामकारकता याविषयी माहिती दिली. मंत्री महोदयांनी सर्व सादरीकरण करणाऱ्या अधिकाऱ्यांचा स्मृतिचिन्ह व पुस्तके देऊन सन्मान केला.
शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी इ. ११ वी प्रवेश, समूह शाळा योजना, यू-डायस प्लस, पवित्र शिक्षक भरती मान्यता यांसारख्या प्रशासकीय विषयांवर मार्गदर्शन केले. राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांनी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेतर्फे राबविण्यात येणाऱ्या योजना व समग्र शिक्षेविषयी माहिती दिली.
यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक मा. राहुल रेखावार यांनी NEP २०२० ची अंमलबजावणी, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम, SQAAF, क्षमता आधारीत प्रश्नपेढी, VSK, कृती पुस्तिकांचे विकसन,शैक्षणिक दिनदर्शिका, पीएम श्री शाळा योजना, ई-विद्या वाहिन्या, योग अभ्यासक्रम मार्गदर्शिका आदी उपक्रमांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

