प्रगत ‘CAR-T Therapy’च्या माध्यमातून यशस्वी उपचार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील खर्चापेक्षाही कितीतरी कमी खर्च
पुणे, १६ जानेवारी २०२४ : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रुग्णालय शृंखलांपैकी एक असलेल्या ‘सह्याद्रि हॉस्पिटल्स’ने पुण्यात ‘CAR-T सेल थेरपी’ सादर करण्यासाठी इम्युनोअॅक्ट या कंपनीशी व्यावसायिक भागीदारी केली आहे. ‘सह्याद्रि’तर्फे आज ही घोषणा करण्यात आली. ‘हेमॅटोलॉजी’वरील सर्वसमावेशक उपचार केंद्रांसह इतर अनेक महत्त्वाच्या आरोग्य सुविधांनी सुसज्ज असणाऱ्या ‘सह्याद्रि हॉस्पिटल्स’मध्ये आता ‘NexCAR19™’ (Actalycabtagene autoleucel) पुरविण्यात येणार आहे. ‘बी-सेल लिम्फोमा’ आणि ‘बी-अॅक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया’च्या उपचारांना दाद न देणाऱ्या किंवा हे आजार बळावलेल्या पंधरा वर्षे व त्याहून अधिक वयाच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी ही ‘CAR-T सेल थेरपी’ डिझाइन करण्यात आलेली आहे.
“कर्करोगाच्या रूग्णांना अत्याधुनिक उपचार प्रदान करण्याच्या आमच्या कटिबद्धतेमध्ये ‘CAR-T सेल थेरपी’मुळे अधिकच भर पडणार आहे. ‘CAR-T सेल थेरपी’ सादर करून आम्ही कर्करोगावरील उपचारांच्या मर्यादा कमी करण्याचे आमचे सततचे प्रयत्न निदर्शनास आणू इच्छितो. या थेरपीतून आम्ही रुग्णांना सध्या उपलब्ध असणारे सर्वात प्रगत उपचारांचे पर्याय देऊ करीत आहोत,” असे प्रतिपादन ‘सह्याद्रि हॉस्पिटल्स’चे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अब्राराली दलाल यांनी केले. ते पुढे म्हणाले, ” CAR-T सेल थेरपीच्या एकत्रिकरणामुळे जटिल स्वरुपाच्या रक्त कर्करोगाच्या उपचारात एक नवीन मापदंड प्रस्थापित होणार आहे. अचूक औषधांचे सर्वोच्च दर्जाचे उपाय योजण्याच्या आमच्या ध्येयाशी हे अनुरुप आहे. या अत्याधुनिक उपचारांमुळे रक्ताच्या विकारांवरील नाविन्यपूर्ण उपचारांच्या क्षेत्रात ‘सह्याद्रि हॉस्पिटल्स’चे स्थान अग्रभागी राहणार आहे. पुण्यातील व महाराष्ट्रातील रुग्णांचे जीवनमान सुधारण्यासाठी हे उपचार उपयुक्त ठरणार आहेत.”
सामान्यतः ‘लिव्हिंग ड्रग्ज’ म्हणून ओळखल्या जाणार्या या वैयक्तिक उपचारपद्धती विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करून, विषाणूजन्य व्हेक्टर वापरून, रुग्णाच्या स्वतःच्या टी-सेल्समध्ये अनुवांशिकरित्या बदल करून तयार केल्या जातात. ‘NexCAR19’ ही भारतात पूर्णपणे विकसित आणि उत्पादित केलेली पहिली ‘CAR-T थेरपी’ असून जगभरात व्यावसायिकरित्या उपलब्ध असलेल्या अशा अंदाजे दहा उपचारांमध्ये तिची गणना होते. अमेरिकेमध्ये तत्सम थेरपीसाठी लाखो डॉलर्स खर्च येऊ शकतो; तथापि या खर्चाच्या सुमारे एक दशांश खर्चामध्ये ही थेरपी आपल्याकडे मिळू शकेल, असे नियोजन करण्यात आले आहे.
‘बी-सेल कॅन्सर’वर एक किंवा त्याहून जास्त पद्धतींनी उपचार करूनही अपयश मिळाले, तर अशा रुग्णांबाबत आशा संपुष्टात येत असते. सध्या अशा उपचारांमध्ये केमोथेरपी, मोनोक्लोनल अँटीबॉडीज आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट यांचा समावेश आहे. सह्याद्रिमधील वैद्यकीय आणि हेमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट अशा वेळी या उपचारांचा दर्जा वाढवण्यासाठी ‘NexCAR19’ वापरू शकतील. प्रारंभीच्या काळात ‘NexCAR19’ची उपलब्धता पुण्यातील सह्याद्रिच्या डेक्कन जिमखाना येथील केंद्रात असणार आहे. या केंद्रातून देशाच्या पश्चिमेकडील व त्यापलीकडील भागामधील रुग्णांना सेवा देण्यात येते.
‘सह्याद्रि हॉस्पिटल्स’मधील हेमॅटोलॉजी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट विभागाचे प्रमुख डॉ. शशिकांत आपटे (M.D., FRCPA) म्हणाले, “सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये आम्ही विविध पार्श्वभूमी असलेल्या रूग्णांवर उपचार करतो. आम्ही दरवर्षी अंदाजे ४५ ते ५० जणांवर बोन मॅरो ट्रान्सप्लांट (अस्थिमज्जा प्रत्यारोपण) करतो. ‘NexCAR19’ची उपलब्धता झाल्याने आता आम्हाला ‘बी-सेल’चा घातक रोग असलेल्या रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्याची मोठी संधी मिळाली आहे. आम्हाला आशा आहे की अशाच प्रकारच्या ‘सेल थेरपी’ रक्ताच्या कर्करोगाच्या इतर प्रकारांसाठीदेखील उपलब्ध होतील आणि त्यामुळे त्यांतील गंभीर व गरजू रुग्णांचीही गरज पूर्ण होईल.”
‘इम्युनोअॅक्ट’चे सहसंस्थापक व बिझनेस डेव्हलपमेंट अँड कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीचे संचालक शिरीष आर्य म्हणाले, “सह्याद्रि हॉस्पिटल्सकडील अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि त्यांचे वैद्यकीयदृष्ट्या पुढारलेले ऑन्कोलॉजिस्ट यांच्या माध्यमातून रुग्णांना ‘NexCAR19’ची उपलब्धता तात्काळ आणि परवडणाऱ्या दरांत होण्यासाठी आमचे संपूर्ण सहकार्य आम्ही देऊ. संशोधनात नावीन्यता आणण्यावर ‘इम्युनोअॅक्ट’मध्ये आमचा भर असतो. या जीवरक्षक थेरपीचे फायदे शक्य तितक्या जास्त रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या मजबूत ‘CAR-T प्लॅटफॉर्म’ची मापनक्षमता वाढवण्यासाठी आमचे हे प्रयत्न केंद्रित आहेत.”

