पुणे-भायखळा जिल्हा कारागृहाच्या बाहेरील परिसरात महिला बंदी व कारागृह अधिकारी/कर्मचारी यांच्या लहान मुलांचे पालनपोषण व सुरक्षा विषयक अडचणी लक्षात घेऊन ‘नन्हे कदम’ हा उपक्रम ‘बालवाडी’ व ‘हिरकणी कक्ष’ संकल्पनेवर आधारित संपूर्ण राज्यांमधील कारागृह विभागात पहिल्यांदाच अशाप्रकारे अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला आहे. त्याअनुसार, ‘नन्हे कदम’ या उपक्रमाचे उद्घाटन अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवाअमिताभ गुप्ता यांच्या हस्ते व कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या उपस्थितीत करण्यात आले असून या उपक्रमास एक वर्ष पूर्ण होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या 2006च्या दिशानिर्देशानुसार महिला बंद्यांच्या मुलांकरीता पाळणा घराची व्यवस्था असणे गरजेचे आहे. परंतु कारागृह विभागातील महिला कर्मचाऱ्यांना त्यांची मुले सुरक्षेच्या कारणास्तव कारागृहाच्या आतमध्ये घेऊन जाणे शक्य नव्हते. तसेच कारागृहात बंदीस्त असलेल्या महिला बंद्यांच्या मुलांवर कारागृहातील नकारात्मक वातावरणाचा परिणाम होऊ नये यासाठी त्यांची मुले कारागृहाबाहेर मोकळ्या वातावरणात ठेवणे आवश्यक होते. या दोन्ही गोष्टींचा सुवर्णमध्य साधून कारागृहाच्या बाहेरील परिसरामध्ये नन्हे कदम या प्रकल्पांतर्गत बालवाडी व पाळणाघर एकाच ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. सदरच्या अभिनव प्रकल्प हा ‘नन्हे कदम’ या नावाने संपूर्ण
महाराष्ट्रात सुरू आहे. महिला कर्मचारी व महिला बंद्यांच्या लहान मुलांकरीता कारागृहाबाहेर एकाच ठिकाणी पाळणाघर (Creche), बालवाडी (नन्हे कदम) सुरु केल्याने सदर अभिनव प्रकल्पाची दखल देश विदेशामध्ये घेण्यात आली आहे. यासंदर्भात श्रीमती. स्तुती शहा, विद्यार्थीनी, पी.एच.डी., कोलंबिया न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की, बंदी व कारागृह कर्मचारी यांच्या मुलांना बालपणीचा आनंद घेण्यासाठी व त्यांच्या समग्र विकासाच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण
अशी जगातील एकमेव पहिली संकल्पना आहे’.
नन्हे कदम हा प्रकल्प आंगन या सामाजिक संस्थेमार्फत राबविण्यात येत असून त्यासाठी संस्थेच्या संस्थापिका श्रीमती. सुपर्णा गुप्ता व स्मिता धर्मामेर यांची बहुमोल मदत झाली असून बंदी व कर्मचारी यांच्या लहान मुलांमध्ये झालेला सकारात्मक बदल व चार भिंतीत कोंडलेले बालपण फुलपाखरासारखे मुक्त झाले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे यश पाहून आंगन या संस्थेच्या मदतीने नन्हे कदम हा अभिनव प्रकल्प येरवडा महिला कारागृह, नागपूर मध्यवर्ती कारागृह व नाशिक मध्यवर्ती कारागृह या तीन ठिकाणी देखील सुरू करण्यात आला आहे.
नन्हे कदम या प्रकल्पासाठी तज्ज्ञ शिक्षक, लहान मुलांच्या पाळणा घर व बालवाडीसाठी लागणारे साहित्य, महिला मदतनिस, महिला शिक्षक यांची नियुक्ती ही अशासकीय संस्थेकडून करण्यात येते व यासाठी लागणारा खर्च हा अशासकीय आंगन या संस्थेकडून करण्यात येत आहे. कारागृह प्रशासन व आंगन या संस्थेच्या समन्वयाने नन्हे कदम हा प्रकल्प सुरळित चालू आहे. या प्रकल्पाचे सकारात्मक परिणाम महिला बंदी व महिला कर्मचारी तसेच त्यांच्या मुलांच्या वागण्यामध्ये दिसून आला. कारागृहातील बंदी व कर्मचारी असा कोणताही भेदभाव न करता एकाच ठिकाणी मुले विश्रांती, खेळणे आणि शिकणे या गोष्टी एकत्रित करीत असून त्यांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी ही एक महत्त्वाची सुरूवात आहे.
सदर प्रकल्पाचे प्राथमिक यश व समाजाकडून मिळालेला उत्स्फुर्त प्रतिसाद पाहून या योजनेची व्याप्ती वाढविण्याचा कारागृह प्रशासनाचा मानस असून आंगन या संस्थेच्या मदतीने नन्हे कदम हा प्रकल्प संपूर्ण राज्यामध्ये राबविण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कारागृह ही केवळ काळकोठडी नसून ते समाज सुधारणेचे सामाजिक मंदिर आहे, हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा कारागृह प्रशासनाचा एक छोटासा प्रयत्न सफल होत आहे.
यासाठी कारागृह विभागाकडून कारागृह महानिरीक्षकअमिताभ गुप्ता , व विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. श्री. जालिंदर सुपेकर कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, योगेश देसाई, या सर्वांचे प्रशासकीय सहकार्य लाभले आहे. त्याचबरोबर आंगन संस्थेच्या संस्थापिका श्रीमती. सुपर्णा गुप्ता व स्मिता धर्मामेर, संस्थेतील कारागृह बोर्डाचे स्वंयसेवक स्वाती आपटे, रचना नार्वेकर, कामना मलिका, मिनोती व परिन लांबा या सर्वांचे आर्थिक, सामाजिक व प्रशासकीय पाठबळ लाभले आहे.
नन्हे कदमः कारागृहातील छोट्यांची किलबिल…
Date: