मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट
शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजन
पुणे : कसबा गणपतीचे विशिष्ट पद्धतीने शेंदूर लेपन करणारे गुरुजी…भाविकांना संस्कृतसह इंग्रजी भाषेत मंत्राचे अर्थ सांगणारे मंडई गणपतीचे गुरुजी…वेळेचे काटेकोर पालन करीत पहाटेपासून श्रद्धेने भगवंताची उपासना करणारे दगडूशेठ गणपतीचे गुरुजी….केवळ विधी पार न पाडता भक्ती, धर्मशास्त्र आणि वैदिक परंपरेचा समन्वय साधत पिढ्यानपिढ्या श्रद्धेने भगवंताची सेवा करणाऱ्या गुरुजींचा सन्मान सोहळा श्री तुळशीबाग गणपती मंडळातर्फे करण्यात आला.
मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या वतीने शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गणपती मंदिरातील पौरोहित्य करणारे पुजारी यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. सारसबाग गणपती मंदिराच्या प्रांगणात हा सन्मान सोहळा झाला. यावेळी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्री देवदेवेश्वर संस्थानचे मुख्य विश्वस्त रमेश भागवत, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रशांत टिकार, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडीत, अभिनेत्री वाळके, मयूर दिवेकर, चकोर सुबंध, साई डोंगरे, प्रतिक इप्ते, किरण चौहान,सागर पेद्दी, उपस्थित होते. तुळशीबाग गणपतीची प्रतिमा सन्मानपत्र, उपरणे, श्रीफळ असे सन्मानाचे स्वरुप होते.
अण्णा थोरात म्हणाले, पौरोहित्य करणारे गुरुजी हे मनापासून त्यांचे काम करत असतात. परदेशातून अनेक लोक दर्शनासाठी येतात. पुजेला बसतात. यावेळी गुरुजी संस्कृतमधून मंत्रोच्चार करत असताना त्याचा अर्थ इंग्रजीत देखील सांगतात, जेणेकरुन आपण काय पुजा करतोय, कशासाठी करतोय हे परदेशी लोकांना देखील कळेल. आपले वेद संस्कृतीचा प्रचार यामाध्यमातून गुरुजी करत असतात.
महेश सुर्यवंशी म्हणाले, आपण भगवंताच्या दर्शनासाठी मंदिरात जातो. त्या मंदिराचे वातावरण प्रसन्न ठेऊन त्याची व्यवस्था अतिशय चोखपणे गुरुजी सांभाळत असतात. वेगवेगळ्या देवाच्या उपासना वेगवेगळ्या असतात त्यांची शास्त्रशुद्धपणे पूजा अर्चा गुरुजी करतात. त्यांच्यामुळेच धर्म टिकून राहतो. रमेश भागवत, श्रीकांत शेटे यांनी मनोगत व्यक्त केले.