पुणे, दि. २२ नोव्हेंबर २०२३: अत्यंत धकाधकीच्या वीजक्षेत्रात सेवा देणाऱ्या महावितरणचे कर्मचारी रात्रंदिवस कर्तव्य बजावत असतात. त्यांच्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मानसिक तणाव येतो. त्याचा परिणाम आरोग्यावरही होतो. त्यामुळे वैद्यकीय उपचारांसाठी कर्मचाऱ्यांना व अवलंबितांना वैद्यकीय उपचारासाठी विम्याचे कवच देण्यात आले आहे. त्याप्रमाणे वैद्यकीय उपचाराच्या खर्चाचे प्रकरणे विमा कंपनीने ताबडतोब निकाली काढावेत असे निर्देश मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी दिले.
पुणे परिमंडल अंतर्गत वैद्यकीय उपचाराच्या खर्चाचे दावे व इतर मुद्द्यांच्या तक्रार निवारणासाठी रास्तापेठ येथील ‘प्रकाशदूत’ सभागृहात नुकतीच बैठक झाली. तीत मुख्य अभियंता श्री. पवार बोलत होते. यावेळी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या वरिष्ठ विभागीय अधिकारी सुनीता भुरेवार, मेडिक्लेम टीपीए मेडिअसिस्ट कंपनीचे महाव्यवस्थापक अमित गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर यांच्यासह विविध कर्मचारी संघटनांचे परिमंडल अध्यक्ष व सचिवांची उपस्थिती होती.
मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी या बैठकीत विम्याचे प्रलंबित दावे आणि इतर तक्रारींच्या निराकरणाचा आढावा घेतला. दाव्यांच्या पडताळणीसाठी विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रसंगी जादा कर्मचारी नेमून विम्याच्या दाव्यांची प्रकरणे ताबडतोब निकाली काढावेत. तसेच कर्मचारी किंवा अवलंबित रुग्णांना रुग्णालयात दाखल करताना आणि उपचार घेताना कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही याची पॉलिसीप्रमाणे विमा कंपनीने काळजी घ्यावी असे निर्देश श्री. पवार यांनी दिले. यावेळी विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी वैद्यकीय खर्चाच्या बिलांबाबत व इतर अडचणींबाबत माहिती दिली. त्याचे निराकरण करण्यासाठी तात्काळ कार्यवाही केली जाईल असे विमा कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

