महापालिका निवडणूक प्रभाग रचनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर…
असा असणार महापालिका प्रभाग रचनेचा कालबद्ध कार्यक्रम !!▶ प्रभाग रचना तयार करण्याची प्रक्रिया 11 जून ते 7 जुलै
▶ प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवणे 8 जुलै ते 10 जुलै 2025
▶ प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्धी व हरकती सूचना मागवणे 22 जुलै ते 31 जुलै 2025
▶ प्राप्त हरकती आणि सूचनांवर सुनावणी 1 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट
▶ निवडणूक आयोगाने अंतिम केलेली प्रभाग रचना प्रसिद्धी 29 ऑगस्ट – 4 सप्टेंबर 2025
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आयोगानुसार, २२ जुलै २०२५ रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर नागरिक, राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांकडून हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत.राज्य सरकारने मुंबई वगळता महाराष्ट्रातील पुणे, नागपूर यासह अन्य महापालिकांच्या निवडणुकीसाठी चार सदस्यांचा प्रभाग असणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार पुणे महापालिकेत ४२ प्रभाग आणि १६५ नगरसेवक असणार आहेत.

राज्य सरकारच्या आदेशानंतर आता कोणता प्रभाग कसा होणार, प्रभाग रचना अंतिम होण्यासाठी किती महिने लागणार, त्यावरून निवडणूक कोणत्या महिन्यात होणार याचा अंदाज राजकीय कार्यकर्त्यांकडून लावला जात आहे. दरम्यान, मनपा निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा मुहूर्त ठरला असून वेळापत्रका जाहीर करण्यात आले आहे.

५ ऑगस्टपर्यंत हरकतींसाठी मुदत देण्यात आली असून, ७ ते १२ ऑगस्टदरम्यान सुनावणी होणार आहे. अंतिम निर्णयानंतर १८ ऑगस्ट रोजी प्रस्ताव आयोगाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२५ दरम्यान अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल. अधिकारी कर्मचाऱ्यांना या वेळापत्रकानुसार सर्व कार्यवाही पूर्ण करावी लागणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या वतीने कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या माध्यमातून आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाने कालावधीनुसार टप्पानिहाय कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, नगर परिषदा तसेच नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांना दिले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाच्या वतीने केला जात आहे. त्यानुसार राज्य सरकारला प्रभाग रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी आता निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत यांच्या प्रमुखांना नियमबद्ध कार्यक्रम आखून प्रभागाची रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नियमबद्ध कार्यक्रमाच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या असून, त्या कालावधीत सर्व शासकीय अधिकाऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.