आरोग्य शिबीरात २४५ जणांची तपासणी
पुणे : रक्तदाब, वजन, रक्तातील साखर, हिमोग्लोबीन यांसारख्या दैनंदिन जीवनातील आवश्यक तपासण्या बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट, हिराबाई कावसजी जहांगीर मेडिकल संशोधन संस्था व सकाळ सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य शिबीरात करण्यात आल्या. शिबीरात २४५ जणांची विनामूल्य तपासणी करण्यात आली.
मंदिराच्या १२८ व्या वर्धापन दिनाच्या निमित्त दत्तमंदिरासमोरील दत्तभवन येथे या शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबीराचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाच्या राज्य युवा धोरण समितीचे मानद सदस्य प्रा. डॉ. मिलिंद भोई यांच्या हस्ते झाले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त अॅड. रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, उप उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, डॉ. पराग काळकर, सुनिल रुकारी, राजेंद्र बलकवडे आदी उपस्थित होते.
ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले की धार्मिक कार्य करताना वंचित घटकांना उपयुक्त असे सामाजिक उपक्रम करण्याला प्राथमिकता दिली पाहिजे. आरोग्य तपासणी शिबीरांतर्गत प्राथमिक तपासण्यां सोबतच नेत्रतपासणी, कान, नाक, घसा तपासणी, हाडांचे व मणक्यांचे आजार, दात तपासणी करण्यात आली. मंदिर परिसरातील महिलांसाठी तपासणी अंतर्गत ज्या रुग्णांना विविध प्रकारच्या समस्या आढळून आल्या आहेत, त्यांना मोफत सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले व औषधांचे वाटप करण्यात आले.
हिराबाई कावसजी जहांगीर मेडिकल संशोधन संस्थेच्या संध्या गायकवाड आणि डॉ. दीपाली लडकत, एच व्ही. देसाई नेत्रालय, गायत्री क्लिनिकचे कान, नाक, घसा तज्ञ डॉ. मिलिंद भोई, सत्यशिव ग्लोबल फाऊंडेशनचे डॉ. रोहित बोरकर, डॉ. सरोदे क्लिनिक व आयकॉन क्लिनिकचे डॉ. अमित सरोदे यांनी या शिबीराकरिता विशेष सहकार्य केले.