मुंबई-न्याय देणारा ट्रिब्युनल हाच आरोपीच्या घरी त्याला भेटायला जातो असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. तसेच यावरूनच देशातील न्याय व्यवस्था किती गंभीर अवस्थेला पोहोचली आहे हे लक्षात येते असा निशाणही संजय राऊत यांनी साधला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावरूनच राऊतांनी टीकास्त्र डागले आहे.
राऊत म्हणाले, ”राहुल नार्वेकर अचानक आजारी पडतात. त्यानंतर प्रकृती बरी झाल्यावर ते लगेच मुख्यमंत्री शिंदेंना भेटायला जातात यावरूनच देशाच्या न्याय व्यवस्थेची गंभीर अवस्था लक्षात येते. ज्या व्यक्तीवर न्याय करण्याची जबाबदारी आहे तोच व्यक्ती अशा प्रकारे आरोपीच्या घरी जातो, चहापान करून हसत हसत बाहेर पडतो. यामुळेच आम्ही संविधान धोक्यात आहे असे म्हणत असतो”, असे संजय राऊतांनी म्हंटले आहे.यावेळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. ‘2024 नंतर नाटके, एकांकिका करणे हेच फडणवीसांचे काम असणार आहे. या राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या गळ्यात दिल्लीच्या गुलामीचा पट्टा असून तो महाराष्ट्राला वेदना देणारा आहे. तसेच दिल्ली या पट्ट्याला खेळवते”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. 2019 ला प्रयोग झाला तर कट्यार पाठीत घुसली आता आम्ही 2021 ला प्रयोग केला असे म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता टोला लगावला होता. यावर संजय राऊत बोलत होते.
पुढे वंचितबाबत बोलतांना संजय राऊत म्हणाले, वंचित हा मविआतील महत्वाचा घटक आहे. अकोल्याची जागा ही परंपरेने प्रकाश आंबेडकर लढत होते. यापुढेही त्यांनीच ती लढावी अशी आमची भूमिका आहे, असे संजय राऊतांनी स्पष्ट केले. तसेच वंचितला मविआमध्ये सामील करून घेण्यासाठी चर्चा सुरू असून सन्मानाने वंचितला सामील करून घेणार असा पुनरुच्चार देखील राऊतांनी केला आहे.
तसेच काँग्रेसचे हायकमांड हे दिल्लीत असल्याने महाराष्ट्रातील नेत्यांची गैरसोय होऊ नये म्हणून दिल्लीला चर्चा सुरू आहे असे राऊतांनी म्हंटले. यावेळी त्यांनी शिंदे आणि अजित पवार गटावर निशाणा साधत शिंदे गट आणि अजित पवार गटाचे हायकमांड हे अमित शहा आणि दिल्ली आहे असे विधान केले आहे. मात्र आमचे तसे काही नाही. आम्ही मुंबईतच होतो आणि राहणार असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.

