पुणे-डायरेक्टरेट ऑफ कस्टम डिपार्टमेंट (डीआरआय) च्या पुणे, मुंबई शाखेतील अधिकाऱ्यांना बँकाकवरुन पुणे विमानतळावर येणाऱ्या विमानातील दाेन प्रवाशांकडे संशयित सामान आहे. त्यानुसार, 12 मे राेजी बँकाकहून पुण्यात आलेल्या विमानातील प्रवाशांच्या सामानाची सखाेल तपासणी केली असता, दाेन प्रवाशांचे सामानात 11 हवाबंद पाऊच मिळून आले. त्याची तपासणी केली असता ते 10.3 काेटी रुपये किंमतीचे बाजारमूल्य असलेले 10.3 किलाे हायड्राेपाेनिक गेंड हा उच्च नशा क्षमता असलेला गांजा सारखा अंमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी डीआरआयने दाेन प्रवासी तसेच मुंबईतील एक वितरक अशा एकूण तीनजणांना अटक केली आहे. पुणे विमानतळावर संबंधित प्रवासी यांच्या सामानाची तपासणी केल्यावर, त्यात 9864 ग्रॅम हिरवट ढेकळासारखा पदार्थ मिळून आला हाेता. त्यामुळे सीमाशुल्क विभागाचे अधिकाऱ्यांनी सदर पदार्थ हा फील्ड टेस्ट कीट मध्ये टाकून त्याची तपासणी केली असता त्या पदार्थाचा अहवाल सकारात्मक आला. त्यानुसार 10.3 किलाे अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. सदर माल घेणाऱ्या मुंबईतील एका वितरकाला देखील तपासात याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्या झडतीत 478 ग्रॅम चरस आणि हायड्राेपाेनिक गेंड असा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबईत रहाणाऱ्या सदर तीन आराेपी विराेधात एनडीपीएस कायदा 1985 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास डीआरआय पुणे पथक करत आहे.