ई टॉयलेट गुंडाळून खाणाऱ्या महापालिकेला आप चा सवाल
पुणे- प्रत्येक रस्त्यावर 500 मीटर अंतरामध्ये स्वच्छ व सुलभपणे वापर करता येईल अशा पद्धतीची स्वच्छता गृहे असावी अशी सामान्य जनतेची अपेक्षा ५० वर्षात पूर्ण करू न शकलेल्या आणि ई टॉयलेट गुंडाळून खाणाऱ्या महापालिकेला 86 लाखाचे एसी स्वच्छतागृहे नेमकी कुणासाठी ? असा सवाल आम आदमी परतीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला आहे.
ते म्हणाले,’ स्वच्छतागृहे हा विषय सामान्य नागरिक, प्रवासी आणि मुख्यत्वे महिलांचा जिव्हाळ्याचा गरजेचा विषय असतो. याबाबत राज्य शासनाने ही वेळोवेळी महामार्गावर स्वच्छतागृह उभी करू असे आश्वासन नेहमीच दिले आहे, परंतु प्रत्यक्षात स्वच्छ स्वच्छतागृहे देणे शासनाला जमलेले नाही. पुण्यासारख्या शहरातही ई टॉयलेट नावाने सुद्धा सव्वा दोन कोटी रुपयांचा मोठा खर्च करून ११ स्वच्छतागृहे उभी केली गेली व आता ती सर्व बंद पडली असून त्याच्या दुरुस्ती व देखभाल खर्चही प्रशासनाला परवडत नाही.त्यानंतर राज्य सरकारच्या मदतीने प्रत्येकी ३६ लाखाची एकूण १५ आकांक्षा स्वच्छतागृहे उभी करण्याचे टेंडर काढण्यात आले. त्यामध्ये सुद्धा खर्चिक स्वरूपातील विविध सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर होता. एकच जागी महिला,पुरुष, तृतीय पंथी साठी एकूण दहा सीटचे टॉयलेट असे त्याचे स्वरूप होते. अजूनही या आकांक्षा व्हीआयपी स्वच्छतागृहांचा पत्ता नाही.आणि आतातर तब्बल प्रत्येकी 86 लाखाचे एसी स्वच्छतागृह (AC toilets) उभे करण्याचे धोरण महानगरपालिका (PMC) राबवत आहे.महिलांच्या संदर्भामध्ये गर्दीच्या ठिकाणांपासून, रस्त्यांवर 500 मीटर अंतरामध्ये स्वच्छ व सुलभपणे वापर करता येईल अशा पद्धतीची स्वच्छता गृहे असावी अशी अपेक्षा सामान्य जनता व्यक्त करीत आलेली आहे. असे असताना बांधकामावर वाढीव खर्च आणि त्याच्या देखभालीची हेळसांड असे महानगरपालिकेचे धोरण आहे असा आरोप आप परवा मुकुंद किर्दत यांनी केला आहे.
यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने काही निकष घालून देत रस्त्यावरील स्वच्छतागृहे कशी असावीत या संदर्भात पुणे महानगरपालिकेत आदेश दिलेले होते. आता महानगरपालिकेने ते आदेश कचऱ्याच्या डब्यात टाकले असावेत.ई टॉयलेट मध्ये बंद पडणारी वेंडिंग मशीन, ऑटोमॅटिक कंट्रोल होते तर आकांक्षा स्वच्छतागृहामध्ये नॅपकिन व सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन योजले आहेत. आणि सध्या प्रस्तावित नवी स्वच्छतागृह वातानुकूलित असणार आहेत . प्रत्यक्षामध्ये शहराच्या प्रवेशद्वाराजवळ वा पुणे स्थानकावर अशा वातानुकूलित स्वच्छतागृहांची मागणी कुठल्याही प्रवाशांनी, संघटनांनी व्यक्त केलेली नसून केवळ स्वच्छ सुटसुटीत आणि मुबलक संख्येने ही स्वच्छतागृह असावी अशी अपेक्षा आहे.
त्यामुळे महानगरपालिकेने ही खर्चिक स्वच्छतागृहे उभी न करता स्वच्छ ,स्वस्तातील व मूलभूत सुविधा असलेली, कमी सीटची परंतु अधिक संख्येने शहरात असावी अशी आम आदमी पार्टीची (Aap) मागणी आहे.खर्चिक सुविधा असलेली बांधकामे मग ती दवाखाने असो किंवा शाळा किंवा स्वच्छतागृहे ,ही मुख्यत्वे कंत्राटदारांच्या सोयीसाठी महानगरपालिका बांधते का अशी शंका आहे असेही मुकुंद किर्दत (Mukund Kirdat) यांनी म्हटले आहे.