पुणे-पुण्यातील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळच्या हत्येचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये 2 हल्लेखोर त्याच्यावर गोळ्या झाडत असल्याचे दिसून येत आहे. शरदसोबत चालत असलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले. दरम्यान, शरदच्या इतर साथीदारांनी त्याला उचलून रुग्णलयात दाखल केले.
2 नामांकित वकिलांचा सहभाग
पुण्यातील कोथरूडच्या सुतारदरा परिसरातील गल्लीमध्ये त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यावेळी हल्ल्यानंतर तो खाली कोसळला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत आठ आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच याप्रकरणात 2 नामांकित वकिलांनाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे दोन्ही वकील या हल्ल्यात सहभागी असल्याचे बोलले जात आहे.
लग्नाच्या वाढदिवसादिवशीच अंत
हल्लेखोरांनी शरद मोहोळवर गोळीबार केला होता. यामध्ये त्याला तीन गोळ्या लागल्या होत्या. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळवर कोथरुडमधीलच खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पंरतु उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, लग्नाच्या वाढदिवसादिवशीच शरद मोहोळचा अंत झाला.
आरोपींकडून शस्रही जप्त
या प्रकरणात जो मुख्य आरोपी आहे त्याला पोलिसांनी पाठलाग करून शिरवळ जवळ ताब्यात घेतलं आहे.या आरोपींकडून 3 पिस्टल जप्त केली आहेत.ज्या पिस्टल मधून शरद मोहोळ याच्यावर हल्ला करण्यात आला होता ती पिस्टल देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या आरोपींकडून हल्ल्याच्या वेळेस वापरलेल्या 2 दुचाकी सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार, यातील काही आरोपींचे शरद मोहोळशी जमिनीवरून आणि आर्थिक गोष्टीवरून वाद झाले होते आणि त्याचाच बदला घेण्यासाठी आज या आरोपींनी शरद मोहोळ याला जिवे मारण्याचा कट रचला. शरद मोहोळ खून प्रकरणात प्रमुख आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याला देखील पोलिसांनी अटक केली आहे.

