पुणे- वानवडी परिसरात एका उच्चभ्रु सोसायटीच्या परिसरात एका मद्यधुंद तरुणीने नववर्षाच्या सुरुवातीला धिंगाणा घातल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी खबर मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पण त्यांनी सदर तरुणी एका बड्या पोलिस अधिकाऱ्याची मुलगी असल्यामुळे कारवाईचा हात आखडता घेतला, असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.वानवडी पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक संजय पतंगे म्हणाले, याप्रकरणी 22 वर्षीय तरुणी विराेधात वानवडी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत साेसायटीतील एका गाडीची काच फुटली असून, त्याबाबत देखील तिच्यावर कारवाई करण्यात येऊन नाेटीस बजावण्यात आली आहे. तिचे वडील पाेलिस निरीक्षक असून मागील 3 वर्षांपासून ते मुलगी व पत्नीपासून विभक्त राहत आहेत. या प्रकरणी सदर तरुणीवर सार्वजनिक ठिकाणी गाेंधळ घालणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भातील सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि,’ वानवडी भागात ऑक्सफर्ड नावाची अलिशान साेसायटी आहे. साेसायटीच्या गेटवर सुरक्षारक्षक देखील तैनात असताे. 31 डिसेंबरच्या रात्री साेसायटीत राहणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याच्या मुलीने मद्यप्राशन केले. तिने सुरक्षारक्षकाशी झटापट करत त्यााला धक्काबुक्की केली. त्यानंतर साेसायटीच्या गेटवर टेबल आणून टाकला. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. तसेच सुरक्षारक्षकाच्या 2 खुर्च्या भिरकावून देत साेसायटीचे गेट जबरदस्तीने बंद केले.त्यानंतर साेसायटीमधील नागरिकांना बाहेर जाण्यास मज्जाव करत धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे साेसायटीतील रहिवाशी एकत्र येऊन मद्यधुंद तरुणीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना तिने ऐकले नाही. त्यानंतर याबाबतची माहिती वानवडी पाेलिसांना देण्यात आल्यावर पाेलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, त्यानंतरही तरुणीने आरडाओरडा करत धिंगाणा सुरुच ठेवला. त्यामुळे पोलिस तिला ताब्यात घेण्यास गेले. त्यावेळी तरुणीने पाेलिस कर्मचाऱ्यांना देखील मारहाण करत सरकारी कामात अडथळा आणला. अखेर पाेलिसांनी आपला खाक्या दाखवत तिला ताळ्यावर आणले. यावेळी माेठ्या प्रमाणात साेसायटीतील व बाहेरील नागरिकांनी गर्दी केली होती.

