डेटा स्वतः च डिलीट केल्याची कोरटकरची कबुली
कोल्हापूर : इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रशांत कोरटकरचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. कोल्हापूर कोर्टाने त्याला आज 2 दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावली. फिर्यादी पक्षाने कोरटकरने फरार असताना कुठे व कसा प्रवास केला? विशेषतः त्याने या कालावधीत कोणत्या वाहनांचा वापर केला? याचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी केली होती. कोर्टाने ती मान्य केली.प्रशांत कोरटकरवर कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्यासह छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक विधान केल्याचा आरोप आहे. त्याला 4 शेजारच्या तेलंगणातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.
आजच्या सुनावणीसाठी पोलिसांनी कोल्हापूर कोर्ट परिसरात कडक बंदोबस्त लावला होता. पण त्यानंतरही अमित कुमार भोसले नामक वकिलाने प्रशांत कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच त्यांना धरल्याने पुढील प्रसंग टळला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, प्रशांत कोरटकरच्या कोठडीवरील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर वकील अमित भोसले कोर्टरुममध्ये आले. त्यांनी तिथेच कोरटकरवर ‘ये पश्या’ म्हणत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित प्रसंगामुळे कोर्ट परिसरात एकच धावपळ उडाली होती.
इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे म्हणाले की, प्रशांत कोरटकर यांचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यात आला त्यावेळी आरोपी फरार होता. तो फरार असताना मदत करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. यात इंदोर, हैदराबाद, सिंकदराबाद अशा अनेक ठिकाणी तो फिरला आहे. इतक्या ठिकाणी फिरताना त्यांच्याकडे एक गाडी होती असे वाटत नाही, एकपेक्षा जास्त गाड्या त्यांने वापरल्या आहेत, त्यांची माहिती घ्यायची असल्याचे म्हणत पोलिसांकडून पोलिस कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. प्रशांत कोरटकर खोटारडे आहेत, हे समोर आले आहे. त्याने पुरावे नष्ट केले आहेत, हे स्पष्ट होत आहे. एका सट्टा बुकीच्या तो संपर्कात आहे. त्याची माहिती समोर येणे सुद्धा आता गरजेचे आहे.सरकारी पक्षातर्फे वकील सूर्यकांत पोवार, इंद्रजीत सावंत यांच्या तर्फे अँड.असीम सरोदे हे ऑनलाइन पद्धतीने सुनावणीत सहभागी झाले आहेत. तर प्रशांत कोरटकर यांच्या तर्फे सौरभ घाग हे प्रत्यक्ष वकील म्हणून उपस्थित होते.
सरकारी वकील सूर्यकांत पोवार म्हणाले की, दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य प्रशांत कोरटकर ने केले आहे. या आरोपीला कोणत्या संघटनेने किंवा व्यक्तीने मदत केली आहे का? हा तपास करावा लागणार आहे. सामाजिक तेढ निर्माण करण्याचा हेतू आरोपीचा होता. फोन केलेला आवाज त्याचाच होता, हे सिद्ध होत आहे. त्याला समाजात तेढ निर्माण करण्यासाठी कोण मदत करत आहे का? याचा तपास करावा लागणार आहे.
यावेळी पोलिस चौकशीत कोरटकरने काही नाव घेतली आहेत. त्यात खरंच त्यांचा सहभाग आहे का? याची चौकशी करण्याची आहे. असा गंभीर गुन्हा असताना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा, धीरज चौधरी याने मदत केल्याचे यात सांगितले जात आहे. काही हॉटेलमध्ये थांबलो होतो हे देखील कोरटकर याने सांगितले आहे. यावेळी कोणतीही ऑनलाईन पैसे दिले नाहीत, त्यामुळे याला कुणी मदत केली हे पहावे लागेल. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी 5 दिवसांची पोलिस कोठडी हवी आहे, अशी मागणी केली होती. पण कोर्टाने 2 दिवसांची कोठडी सुनावली आहे.
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना मोबाइलवरून धमकावणारा प्रशांत कोरटकर (50, रा. नागपूर) याच्या आवाजाचे नमुने बुधवारी फॉरेन्सिक अधिकाऱ्यांनी घेतले. तत्पूर्वी मंगळवारी मध्यरात्रीपासून ते बुधवारी पहाटेपर्यंत पोलिसांनी त्याची पाच ते सहा तास कसून चौकशी केली. यामध्ये मोबाइलमधील डेटा स्वतः डिलीट केल्याची कोरटकरने कबुली दिली असून अटक टाळण्यासाठी तो हैदराबादमार्गे चेन्नईला पळून जाण्याच्या तयारीत होता, अशी माहिती पुढे आली आहे. दरम्यान, आजही दिवसभर कोरटकर याची चौकशी सुरू होती.