- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्यावतीने ‘खेळ पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन; डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती
मुंबई – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘खेळ पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विधान परिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे प्रमुख उपस्थित होत्या. यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना डॉ. गोऱ्हे यांनी महिला शिक्षण आणि सशक्तीकरणाचा महत्वाचा मुद्दा मांडला.
आपल्या भाषणात डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, रमाई आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांसारख्या महान महिलांनी समाजप्रबोधन आणि शिक्षणासाठी मोलाचे कार्य केले. आजही महिला शिक्षण आणि त्यांचे सशक्तीकरण हाच समाजाच्या प्रगतीचा खरा मार्ग आहे.” त्यांनी उपस्थित सर्व महिलांना “भावी नगरसेविका होण्याची संधी आहे,” असे सांगून त्यांना सामाजिक आणि राजकीय नेतृत्वाची संधी घेण्यासाठी प्रोत्साहन दिले.
या कार्यक्रमात शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या, विभाग प्रमुख, माजी नगरसेविका आणि अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने शिवसेना सातत्याने काम करत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, “घरगुती जबाबदाऱ्या सांभाळतानाच महिला आपल्या शिक्षणाचा आणि कौशल्यांचा योग्य उपयोग करत आहेत. त्यामुळे त्यांची सामाजिक आणि आर्थिक प्रगती अधिक वेगाने होत आहे.” यावेळी उपस्थित महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि या कार्यक्रमाचे भरभरून स्वागत केले.
या कार्यक्रमात शिवसेना उपनेत्या कला ताई शिंदे, संपर्क प्रमुख वीणा भागवत, विभाग प्रमुख शीतल म्हात्रे बिट्रा आणि भक्ती ताई भोसले या मान्यवरांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन कुणाल सरमळकर आणि पल्लवी कुणाल सरमळकर यांनी केले होते.

