आंबेगाव – येथील निरगुडसर – शिंगवे येथील रोहिदास रंगु गोरडे यांच्या शेतातील ऊस तोडणी सुरू असताना, सापडलेली वीस ते पंचवीस दिवसाची तीन बिबट्याची पिल्ले वनविभागाला अवघ्या सव्वा तासात आईच्या कुशीत सोडण्यात यश आले. ही घटना आज सकाळी घडली.
शिंगवे येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची ऊस तोडणी चालू असताना ऊसात बिबट्याची साधारण वीस ते पंचवीस दिवस वयाची तीन पिल्ले आढळली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारीसह रेस्क्यु टिम मेंबर व निसर्ग अभ्यासक दत्तात्रय माधवराव राजगुरव शिंगवे व कु. शारदा दत्तात्रय राजगुरव हे घटनास्थळी पोहचले. सापडलेली बिबट्याची पिल्ले ताब्यात घेऊन वजने घेतली, पिल्ले चांगली सूद्रूढ व तंदुरुस्त होती.
त्यानंतर सकाळी दहा वाजुन दहा मिनिटांनी कॅमेरा ट्रॅप लाऊन पिल्ले बिबट्याच्या मादीकडे सोपवण्याची तयारी केली. त्यावेळी शेजारच्या ऊसाच्या शेतातून बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज येत असल्याचे सांगितले. त्यानंतर ताबडतोब सर्व ऊसतोडणी कामगारांना ऊस तोडणी थांबवण्याची सुचना दिली.
साधारण एक तासाने अकरा वाजुन दहा मिनिटांनी मादी बिबट्या पहिले पिल्लू नेण्यासाठी आली व पाच दहा मिनीटांच्या अंतराने उरलेली दोन्ही पिल्ले बिबट्या मादीने सुरक्षीत ठिकाणी घेऊन गेली व सव्वा तासात बिबट्याची पिले सुरक्षीत मादीकडे पोहचली.

